
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार आणि मनमानी कारभाराचा कळस झाला आहे. गावमळा ते कुरधुंडा बंदर स्टॉप दरम्यान महामार्गावर ‘आर.एम.सी’ तयार होऊन आलेले सिमेंट-खडीचे रासायनिक मिश्रण वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून हे घातक मटेरियल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच सांडले आहे. कोणतीही सुरक्षा न बाळगता आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या या वाहतुकीमुळे हा संपूर्ण रस्ता आता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून, ठेकेदाराच्या या निष्काळजी पणामुळे वाहनचालक व जनतेतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ठेकेदार कंपनीच्या ‘आर.एम.सी.’ मिक्सर गाड्यांमधून सांडलेले हे सिमेंट, खडी आणि रसायनांचे मिश्रण आता रस्त्यावरच कडक झाले असून यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सांडलेल्या खडी आणि सिमेंट मुळे दुचाकी व चारचाकी वाहने घसरून भीषण अपघात होण्याचा धोका वाढला असून, कंत्राटदाराने आपले खिसे भरण्यासाठी जनतेचा जीव मुठीत ठेवला आहे का, असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत.
ठेकेदार कंपनीला हे महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत आधीच हुकली असून, प्रशासकीय कारवाई किंवा दंडापासून वाचण्यासाठी सध्या कंत्राटदाराकडून कामाची कमालीची घाई केली जात आहे. केवळ ही डेडलाईन गाठण्याच्या अट्टाहासापोटी आणि स्वतःचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ठेकेदार कंपनीने अत्यंत बेजबाबदार कारभार सुरू केला असून, या घाईगडबडीत सर्वसामान्य जनतेला थेट संकटाच्या खाईत लोटण्याचा अक्षम्य प्रकार केला जात आहे.
रस्त्यावर पडलेले हे घातक ‘आर.एम.सी.’ मिश्रण वेळीच उचलण्याची किंवा रस्ता साफ करण्याची साधी तसदीही संबंधित ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग प्राधिकरणाकडून घेण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता, जेव्हा हे आर.एम.सी. मटेरियल रस्त्यावर ओले असताना सांडले, तेव्हाच ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर पाणी मारून ते सहज साफ करणे गरजेचे होते, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. आता हे मटेरियल रस्त्यावर कडक सुकल्यानंतर त्याचे अतिसूक्ष्म कण भरधाव वाहनांमुळे हवेत उडत असून, या रासायनिक धुळीमुळे संपूर्ण परिसराला रोगराईच्या कचाट्यात ढकलले जात आहे.
या रस्त्यावरून वाहने गेल्यानंतर उडणारी ही धूळ साधीसुधी नसून, सिमेंट लवकर सुकू नये किंवा ते अधिक कडक व्हावे यासाठी त्यात अत्यंत घातक रासायनिक मिश्रणे वापरलेली असतात. ही रासायनिक धूळ थेट दुचाकीस्वार आणि प्रवाशांच्या डोळ्यात जात असून, सिमेंटमधील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांची तीव्र जळजळ होत आहे. या प्रकारामुळे वाहनचालकांचे डोळे निकामी होण्याचा किंवा डोळ्यांचे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून, प्रवाशांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ महामार्ग प्रशासन उघड्या डोळ्यांनी कसा पाहत आहे, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रासायनिक धुळीचा दुसरा मोठा फटका महामार्गालगतच्या शेतीला आणि फळबागांना बसत आहे. उडणारी ही विषारी रासायनिक धूळ आजूबाजूच्या पिकांवर आणि आंबा, काजूच्या झाडांवर जाऊन बसत असल्याने पानांवर सिमेंट आणि रसायनांचा घट्ट थर साचला आहे. यामुळे झाडांची नैसर्गिक अन्न तयार करण्याची प्रक्रियाच खुंटली असून, चालू हंगामातील पिके आणि फळबागा जळून खाक होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा ठेकेदार हिरावून घेत असल्याचा आरोप आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
महामार्गावरून जाताना डोळे आणि नाक बंद करून प्रवास करावा लागत असल्यामुळे संबंधित विभागाने या ठेकेदाराला तात्काळ जाब विचारून हे घातक मटेरियल रस्त्यावरून हटवले पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे. ‘आर.एम.सी.’ सांडल्यामुळे उद्भवलेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, महामार्ग प्राधिकरणाने आणि प्रशासनाने तात्काळ जागे होऊन येथील ठिकाणची पाहणी करून कारवाई करण्याची मांगणी जनतेतून केली जात आहे.
या जीवघेण्या वाहतुकीला प्रादेशिक परिवहन विभाग देखील तितकाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. महामार्गावरून धावणाऱ्या या ‘आर.एम.सी.’ मिक्सर गाड्या आणि डंपर उघड्या तोंडाने मटेरियल सांडत राजरोसपणे फिरत असतानाही, आर.टी.ओ. विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. परिवहन विभागाच्या या ढिसाळ आणि थंड कारभारामुळेच ठेकेदाराची मुजोरी वाढली असून, आर.टी.ओ.ने या धोकादायक वाहनांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


























































