
वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी तथा स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉक्टर लेन शाखेतील कॅश इन्चार्ज आदित्य प्रकाश सेनगावकर (वय ४०) याचा राजस्थानमधील भरतपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित गुन्ह्याच्या तपासाला नवे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात तीन आठवड्यांपूर्वी बँकेच्या लॉकरमधील ऑडिटमध्ये तपासणी करताना विभागीय अधिकाऱ्यांना आणि बँक शाखाधिकाऱ्यांना ४५० ग्रॅम मूळ सोने बदलून त्याठिकाणी बनावट सोने लॉकरमध्ये ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, त्यापैकी एकास अटक झाली होती तर आदित्य सेनगावकर हा फरार झाला होता. या प्रकरणातील आरोपी आदित्य सेनगावकर हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीपासूनच फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, राजस्थान राज्यातील भरतपूर येथील एसजीएन हॉस्पिटल पोलीस चौकीकडून नांदेड पोलिसांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार, आदित्य सेनगावकर हा भरतपूर येथे वास्तव्यास असताना त्याला छातीत तीव्र वेदना होत असल्याने उपचारासाठी एसजीएन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच १३ जून २०२६ रोजी पहाटे २:२० वाजण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
सध्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकार अथवा अन्य वैद्यकीय कारणांमुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत कारण अहवालानंतरच समोर येणार आहे.
विशेष म्हणजे, सेनगावकर हा जवळपास १५ मेपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या बेपत्ता होण्याबाबत संबंधित ठिकाणी मिसिंग रिपोर्टदेखील दाखल करण्यात आला होता. मात्र हा बेपत्ता अहवाल दाखल करताना अनेकांनी हस्तक्षेप केल्याच्या चर्चांमुळे या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. त्यामुळे मिसिंग रिपोर्ट, फरारी आणि त्यानंतर झालेला मृत्यू या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी होण्याची मागणी पुढे येत आहे.
या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, आरोपीच्या बेपत्ता होण्यामागील कारणे आणि मृत्यूपूर्वीच्या हालचाली यांचा तपास आता महत्त्वाचा ठरणार असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.


























































