
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी हॉटेल मिंन्ट येथे आढावा बैठक घेण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
शिवसेना नेते अंबादास दानवे सध्या मराठवाड्याच्या दौर्यावर असून शनिवारीसायंकाळी त्यांच्या उपस्थितीत हॉटेल मिंन्ट येथे शिवसेना पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्यांनी सज्ज व्हावे, जनतेचे प्रश्न आपल्याला महत्वाचे असून, दुष्काळ, पाणीटंचाई, स्थानिकचे प्रश्न घेवून जनतेत जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
बिएलएच्या नियुक्त्या, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी, संघाटनात्मक स्थिती व नियोजन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे गतवैभव आपल्याला मिळवून द्यायचे आहे, जिल्ह्यात यापूर्वी चार आमदार आपले होते, तर नांदेड जिल्हा परिषदेवर दोनवेळा सत्ता आपण मिळवली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, यासाठी मतदार नोंदणी, वगळलेली नावे, जनगणना तसेच नव्या मतदार नोंदणीसंदर्भात जनतेत जावून आपल्याला काम करायचे आहे. संघटनात्मक नियोजनासाठी गावपातळीवर शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या भेटीगाठी व त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याबाबत प्रत्येक पदाधिकार्यांनी अंग झोकून कामाला लागायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील १६ तालुक्याच्या तालुकाप्रमुखांकडून त्यांच्या कामाचा आढावा, पक्ष संघटनेबाबत त्यांनी केलेली कामे, मतदारसंघात असलेली तयारी, आरक्षणासंदर्भात असलेली माहिती, गण आणि गटाच्या संदर्भात असलेली जिल्हा परिषदेची तयारी याबाबत प्रत्येकाकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. बुथ स्तरापर्यंत पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी सतर्क राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, दक्षिणचे महानगरप्रमुख मनोज यादव, सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, राम चव्हाण, तालुकाप्रमुख सुनिल पाटील, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, युवासेनेचे विभागीय सचिव महेश खेडकर, पुरुषोत्तम धोंडगे, सतीश पाटील उमरेकर, साहेबराव मामीलवाड, बालाजी कल्याणकर (पिंपळगाव), वच्छलाताई पुयड आदी मान्यवर व्यासपीठावर होते तर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

























































