Nanded News – उस्माननगर पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; 20 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उस्माननगर पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 13 जून रोजी) रात्री 10.25 वाजण्याच्या सुमारास कौठगाव फाटा मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड) परिसरात ही कारवाई करण्यात आली. एका हायवातून अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान एका हायवा वाहनात अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

यावेळी पोलिसांनी अंदाजे चार ब्रास रेती ज्याची किंमत 20 हजार रुपये आणि हायवाची किंमत 20 लाख रुपये असा एकूण 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक गोपीनाथ संभाजी भुरे (38, रा. धनंज बु. ता. लोहा) याच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉ गंगाधर चिंचोरे, प्रकाश पेदेवाड, माधव पवार, संतोष सिदने यांच्यासह उस्माननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.