बांगलादेशच्या क्रिकेटपटूला पोलिसांनी चोपलं; तीन अधिकारी निलंबीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेश क्रिकेट सध्या मैदानाबाहेर घडलेल्या एका मोठ्या वादामुळे चर्चेत आले आहे. बांगलादेशच्या एखा खेळाडूचा आणि पोलिसांमधील वाद इतका विकोपाला गेला की, याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही घटना १२ जून रोजी उशिरा रात्री चितगाव येथे घडली. ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग संपवून घरी परतत असताना हा प्रकार घडला.

हा वाद झाला तेव्हा पोलिसांनी या क्रिकेटपटूला जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. नईम हसन असे या खेळाडूचे नाव असून तो बांगलादेशचा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. तो एक फिरकीपटू असून बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. नईमने आरोप केला आहे की, तो रिक्षाने जात असताना पोलिसांनी त्याला थांबवले आणि सुरुवातीपासूनच आक्रमक वर्तन केले. पोलिसांनी त्याला पकडलं आणि जबरदस्तीने दुसऱ्या रिक्षामध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी तो राष्ट्रीय क्रिकेटपटू असल्याचे सांगूनही पोलिसांनी कोणाचेही ऐकले नाही.

या घटनेनंतर संपूर्ण बांगलादेशात संतापाची लाट उसळली आहे. वाढता गदारोळ पाहून चितगाव मेट्रोपॉलिटन पोलिसांनी कारवाई करत सब-इन्स्पेक्टर मोहम्मद शफीकुल इस्लाम भुइयां आणि कॉन्स्टेबल मोहम्मद रासेल चौधरी यांच्यासह तीन पोलिसांना निलंबित केले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः नईम हसनच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. “जर स्थानिक नागरिक आणि माझे पाठीराखे तिथे नसते, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती,” अशी भीती नईमने नंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.