
वणी शहरातील एसपीएम शाळेमागील परिसरात एमडी (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत एमडी ड्रग्स, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यात एमडी ड्रग्सचा वापर वाढत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी वणी परिसरात सापळा रचण्यात आला.
एसपीएम शाळेच्या मागील बाजूस नगर परिषद शाळा क्रमांक ३ समोरील मोकळ्या मैदानात दोन युवक एमडी ड्रग्स विक्रीसाठी थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून सुमारे ४१ हजार ३७० रुपयांचे ५.९१ ग्रॅम एमडी ड्रग्स, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, वणीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर आणि त्यांच्या पथकाने केली.
शाळेजवळ ड्रग्सचा व्यापार, तीव्र संताप व्यक्त
विद्यादानासारखे पवित्र कार्य ज्या परिसरात चालते, त्याच शाळेच्या परिसरात एमडीसारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्याने पालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत मोठ्या शहरांपुरता मर्यादित मानला जाणारा एमडी ड्रग्सचा विळखा आता ग्रामीण आणि निमशहरी भागापर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून हा प्रश्न संपणार नाही. या अंमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होतो, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि जिल्ह्यात हे जाळे किती खोलवर रुजले आहे, याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज व्यक्त होत आहे. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापूर्वी कठोर आणि व्यापक कारवाई होणे काळाची गरज बनली आहे.




























































