
शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याच्या अंतरिम जामिनावर बेलापूर न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. एका 26 वर्षीय विवाहितेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी साहिलवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात रबाळे पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्ह्याचा तपास आता वाशी पोलिसांकडे देण्यात आला आहे.
पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर रबाळे पोलिसांनी साहिलच्या विरोधात गुन्हा दाखल केला, मात्र त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी आरोपीला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने न्यायालयात त्याला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला. मात्र पोलीस आयुक्तांनी आता हा गुन्हा वाशी पोलिसांकडे वर्ग केला आहे. मंगळवारी साहिलच्या अंतरिम जामिनावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. उद्या पुन्हा याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
शिवसेनेने उठवला होता आवाज
पीडित तरुणीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आवाज उठवला होता. शिवसेना राज्य संघटक अवधेश शुक्ला, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांनी या तरुणीला न्याय मिळावा यासाठी जोरदार पाठपुरावा केला.

























































