
कर्करोग हा एक गंभीर आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर माणूस कितीही पैलवान असला तरी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. पण या जीवघेण्या आजाराला फक्त हरवलंच नाही, तर मृत्यूलाही प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल लिसा रे हिने चकवा दिला आहे. आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल अर्थात कर्करोगाच्या लढ्याबाबत ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
‘कसूर’, ‘नेताजी’,’ वॉटर’, ’99 सॉग्स’, ‘विरप्पन’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लिसा रे हिला 2009 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी माझ्याकडे फक्त 5 वर्षांचा वेळ असल्याचे सांगितले होते. हे ऐकून भल्याभल्यांची पायाखालची जमीन सरकली असती. पण लिसाबाबत असे झाले नाही. माझ्यासोबतच असे का घडले हा विचार आपल्या मनात आला नाही. उलट सगळे ठीक होईल. हा प्रवास सोपा नसेल, पण मी यातून नक्कीच बाहेर पडेल असा आवाज आतून येत होता, असे लिसाने सांगितले.
कर्करोगाचे निदान झाले हा माझ्यासाठी एक वेक-अप कॉल होता, असे ती म्हणाली. हा कर्करोग माझ्या बोन मॅरोमध्ये म्हणजेच शरीराच्या सर्वात खोल भागात होता. याचे कारण म्हणजे मी माझे खरे आयुष्य जगतच नव्हते. मी जगासमोर स्वतःचे वेगळे मुखवटे घेऊन वावरत होते. या आजाराने मला स्वतःची खरी ओळख करून दिली आणि कोणत्याही भीतीशिवाय जगायला शिकवलं, असेही लिसा म्हणाली.
जेव्हा डॉक्टरांनी लिसाला सांगितले की तिच्याकडे फक्त 5 वर्षे आहेत तेव्हा लिसाने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले. कधीकधी आयुष्यात थोडासा भ्रम किंवा नकारात्मक गोष्टींकडे केलेलं दुर्लक्षही तुमच्या फायद्याचे ठरते. डॉक्टरांनी काहीही आकडे दाखवले तरी मी त्यावर विश्वास ठेवायला स्पष्ट नकार दिला होता, असेही ती म्हणाली. तसेच कर्करोगामुळे आपण घेत असलेल्या अन्नाकडे एक औषध म्हणून पाहिले, असेही तिने सांगितले.
पहिल्यांदा बरी झाल्यानंतर लिसाचा कर्करोग पुन्हा उलटला होता. याबद्दल सांगताना ती म्हणाली, हॉस्पिटल सोडल्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो. कर्करोग पुन्हा झाल्यावर मी नेहमीच्या उपचारांसोबतच रॉ फूड डाएट आणि जीवनशैलीत मोठे बदल केले. चमत्कार म्हणजे यामुळे दुसऱ्यांदा बोन मॅरो ट्रान्सप्लांट न करताच मी पुन्हा बरी होऊ शकले, असेही लिसाने सांगितले. हा आजार झाल्यानंतर अनेकांनी आपल्याला तो लपवून ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण मी काय चोरी केली का? कर्करोग झाला त्यात लाज कसली? असे म्हणत मी त्याबद्दल उघडपणे बोलू लागल्याचेही तिने सांगितले.




























































