
आश्रमशाळेतील मुलींना मासिक पाळीच्या काळात हक्काचा आराम आणि मानसिक बळ मिळावे या उद्देशाने पेणच्या आदिवासी विकास प्रकल्प विभागाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील आश्रमशाळेत स्पेशल ‘पिंक रूम’ साकारली असून मासिक पाळीच्या काळात चार दिवस मुलींना या ‘पिंक रूम’मध्ये सुरक्षित वातावरणाची अनुभूती मिळणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्या कल्पकतेतून ‘पिंक रूम’ साकारण्यात आली आहे. वसतिगृहातील एका स्वतंत्र खोलीला अत्यंत सुसज्ज आणि सुंदर स्वरूप देण्यात आले आहे. या ‘पिंक रूम’मध्ये प्रवेश करताच एका सुरक्षित वातावरणाची अनुभूती येते. मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तेथे आरामदायी बेड, गरम पाण्याची पिशवी आणि पिण्याच्या गरम पाण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. यासोबतच प्रथमोपचार व औषध पेटी आणि वजन काटाही ठेवण्यात आला आहे. ‘पिंक रूम’चे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, ललितकुमार वराडे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख | उपस्थिती होती.
काय आहे संकल्पना ?
मुलींचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ‘पिंक रूम’मध्ये इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांची पुस्तके असलेले छोटे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध, सोशल मीडियाची सुरक्षितता आणि सर्व महत्त्वाचे आपत्कालीन हेल्पलाइन नंबर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन ही खोली मुलींसाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित कवच’ बनली आहे






























































