
आजच्या डिजिटल युगात आपण सगळेच मोबाईलवर गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंग वापरतो. बँकाही आपल्याला डिजिटल इंडियाचे महत्त्व पटवून देत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? बँक जरी डिजिटल झाली असली, तरी अजूनही त्यांचा कोट्यवधी रुपयांचा कारभार पेन आणि कागदावरच चालतोय. आर्थिक वर्ष 2025 मध्ये बँकांनी चेकबुक, पासबुक, फॉर्म्स आणि स्टेटमेंट छापण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे ही आकडेवारी जाहीर केली आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या यादीत आघाडीवर आहे. एसबीआयने 2025 मध्ये छपाई आणि स्टेशनरीवर तब्बल 986.4 कोटी खर्च केले आहेत. त्याखालोखाल खासगी क्षेत्रातील आघाडीची एसडीएफसी ही बँक आहे. एचडीएफसाने 922.5 कोटी रुपये स्टेशनरीवर खर्च केले आहेत.
एसबीआय आणि एचडीएफसीचा स्टेशनरीवरील खर्चाचा आकडा मोठा दिसत असला तरी त्यांच्या एकूण नफ्याच्या तुलनेमध्ये हा खर्च जेमतेम 1.3 टक्के एवढा आहे. मात्र इतर खासगी बँकांनी आपल्या नफ्यातील मोठा वाटा यावर खर्च केल्याचे दिसून आले आहे. यात आयडीएफसी फर्स्ट बँक आघाडीवर आहे. या बँकेने तब्बल 122.7 कोटी रुपये स्टेशनरीवर खर्च केले आहे. एसबीआय आणि एचडीएफसीपेक्षा हा आकडा कमी असला तरी एकूण निव्वळ नफ्याच्या तब्बल 8.05 टक्के हिस्सा बँकेने स्टेशनरीवर उडवला आहे.
बँकांनी स्टेशनरीवर किती केला खर्च?
आयडीएफसी फर्स्ट बँक – 122.7 कोटी (नफ्याच्या 8.05 टक्के हिस्सा)
इंडसइंड बँक – 114.9 कोटी (नफ्याच्या 4.46 टक्के हिस्सा)
येस बँक – 70 कोटी (नफ्याच्या 2.86 टक्के हिस्सा)
एयू स्मॉल फायनान्स बँक – 58.3 कोटी (नफ्याच्या 2.77 टक्के हिस्सा)
अॅक्सिस बँक – 373.8 कोटी (नफ्याच्या 1.33 टक्के हिस्सा)
स्टेट बँक ऑफ इंडिया – 986.4 कोटी (नफ्याच्या 1.22 टक्के हिस्सा)
आयसीआयसीआय बँक – 318.5 कोटी (नफ्याच्या 0.58 टक्के हिस्सा)
How much do Banks spend on Pen & Paper?
(Costs for FY25) pic.twitter.com/OViC5vd8Bl
— Groww (@_groww) June 17, 2026
डिजिटल युगातही कागदाची एवढी गरज का?
दरम्यान, बँका पूर्णपणे डिजिटल होण्याचा दावा करत असल्या, तरी आजही कायदेशीर कागदपत्रे, खाते उघडण्याचे फॉर्म्स, ग्राहकांसाठी लागणारी चेकबुक्स, पासबुक प्रिंटिंग आणि अंतर्गत प्रशासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणावर कागदाचा वापर करावा लागतो. एकंदरीत काय, तर आपण कितीही ऑनलाईन झालो, तरी बँकांचा पेन आणि पेपरचा हा जुना सलोखा इतक्यात संपणारा नाही, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.



























































