
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल शनिवारी देण्यात आला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. माफीच्या साक्षीदार पारसमल जैन याची साक्ष विश्वासार्ह नाही असे म्हणत न्यायालयाने पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे.
2006 double murder case of then Congress leader Pawanraje Nimbalkar and his driver Samad Kazi | CBI Court acquits all accused, including ex-NCP Leader Padamsinh Patil, for lack of evidence. A total of 9 people were arrested in this matter.
— ANI (@ANI) June 20, 2026
3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. विशेष न्यायालयामध्ये जवळपास 20 वर्षे हा खटला चालला. गेल्यावेळी मुख्य शूटर पिंटू चौधरी (पिंटू सिंह) याला प्रत्यक्ष कोर्टात हजर न केल्याने विशेष न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत निकालासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी म्हटले आणि सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब केली होती.
दरम्यान, हे प्रकरण प्रथम नवी मुंबई पोलिसांकडे होते. मात्र तपासाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर निंबाळकर यांच्या पत्नीच्या मागणीनुसार याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सीबीआयने माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय आणि व्यावसायिक वैरातून हत्या घडवून आणल्याचा आरोप ठेवला होता.
सुमारे 20 वर्षे चाललेल्या या खटल्यात 128 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही समावेश होता. हत्येची सुपारी स्वीकारल्याचा आरोप असलेला पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार झाला. या खटल्यावर शनिवारी निकाल देण्यात आला. या सुनावणीवेळी 86 वर्षांचे पद्मसिंह पाटील हे देखील उपस्थित होते.
हल्ल्यात वापरलेल्या गाडीचे तपशील जुळत नाहीत, तसेच मयत व्यक्तीचे सीडीआर आणि इतरांचे सीडीआरही जुळत नाहीत असे न्यायालयाने म्हटले. एवढेच नाही तर माफीच्या साक्षीदाराच्या जबानीतही प्रचंड तफावत आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
#WATCH | Mumbai | Prime accused, ex-NCP Leader Padamsinh Patil, now 86 years old, brought to the Special CBI Court, to appear in the June 3, 2006 double murder case of then Congress leader Pawanraje Nimbalkar and his driver Samad Kazi. pic.twitter.com/ngimPcvvDD
— ANI (@ANI) June 20, 2026




























































