
रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरील वाढता ताण कमी करण्यासाठी डोंबिवलीकरांना लवकरच जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवलीतील मोठागाव येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून आवश्यक सुरक्षा चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे डोंबिवलीहून ठाणे, मीरा भाईंदर, वसई तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत झिप झेंप झूप प्रवास शक्य होणार आहे.
मुंबई आणि उपनगरांना जोडण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १० हजार वॉटर टॅक्सी सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना मांडली होती. त्याअंतर्गत कल्याण-डोंबिवलीपासून वसई-विरारपर्यंत सेवा विस्तारली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ६ हजार ६६ कोटी रुपये खर्चुन ३४०.६८ किलोमीटर लांबीचे जलवाहतुकीचे जाळे उभारण्याचे काम सुरू आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर या शहरांना या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. ठाणे आणि त्यापुढील स्थानकांवरील वाढती प्रवासी संख्या, अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि रस्त्यांवरील वाहतूककोंडी यामुळे नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मेरिटाईम विभागाने जलवाहतुकीचा पुढे आणलेला पर्याय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पहिला टप्पा डोंबिवली ते गायमुख
पहिल्या टप्प्यात डोंबिवली ते ठाणे गायमुख या मार्गावर सेवा सुरू करण्यात येणार असून त्यानंतर दोन प्रमुख मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये डोंबिवली-ठाणे-मीरा-भाईंदर-वसई हा पहिला मार्ग तर डोंबिवली-दिवा-ठाणे-नवी मुंबई विमानतळ हा दुसरा मार्ग असणार आहे. विशेष म्हणजे जलवाहतुकीमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अवघ्या ७० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.





























































