
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है…’ अशा शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणांनी शुक्रवारी संपूर्ण शीव परिसर दुमदुमून गेला होता. निमित्त होते ते शिवसेनेच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्याचे. दुपारपासूनच हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन आणि भगवी उपरणी घालून या मेळाव्यात सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. कितीही गद्दारी झाली तरी आम्ही ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत. जिथे ठाकरे तिथे निष्ठा…जिथे निष्ठा तिथे शिवसैनिक असे जणू वचनच या जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी दिले.

































































