धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखे लोक सत्तेत असेपर्यंत मुलांचे भविष्य सुरक्षित नाही; विजय वडेट्टीवार यांनी केली शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षेतील सततच्या गोंधळामुळे आणि अनियमिततेमुळे देशातील राजकीय आणि शैक्षणिक वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “धर्मेंद्र प्रधान यांच्यासारखी व्यक्ती सत्तेत असेपर्यंत देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहू शकत नाही,” अशी टीका करत वडेट्टीवार यांनी प्रधान यांना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान हे शिक्षणमंत्री पदासाठी अजिबात योग्य नाहीत, त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. जर या सरकारमध्ये थोडी जरी जबाबदारीची जाणीव असेल, तर त्यांनी या परीक्षांमधील अनियमितता त्वरित दूर केल्या पाहिजेत. या लोकांकडून आम्ही कोणतीही अपेक्षा ठेवू शकत नाही. जोपर्यंत प्रधान यांच्यासारखे लोक सत्तेत बसले आहेत, तोपर्यंत आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित मानले जाऊ शकत नाही.”

सध्या नीट-युजी परीक्षेच्या घोळावरून विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी उडत आहेत. २१ जून रोजी होणाऱ्या नीटच्या पुनर्परीक्षेसाठी नागपूरमधील एका विद्यार्थ्याने परीक्षा केंद्र म्हणून नागपूरचा पर्याय निवडला होता. मात्र त्याला चक्क संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथील परीक्षा केंद्र देण्यात आले. परीक्षेच्या अगदी एक दिवस आधी हा प्रकार समोर आल्याने विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबात प्रचंड संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या धक्कादायक प्रकारावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही X वर पोस्ट करत केंद्र सरकार आणि परीक्षा यंत्रणेवर कडाडून टीका केली होती. एक महिन्यापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रवेशपत्र डाउनलोड करताना अबू धाबीचे केंद्र मिळणे हे अत्यंत निराशाजनक असल्याचे ते म्हणाले होते.