
अमेरिकेतील शिकागो शहरात गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. एसयूव्हीमधून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये 17 ते 47 वयोगटातील आठ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री एक एसयूव्ही कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी वर्दळीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आसपासचा परिसर सील केला आहे.
हा हल्ला कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, शिकागो पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवार संध्याकाळपासून शहरात 21 जणांना गोळ्या लागल्या असून, त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरातील वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
























































