राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी केजरीवाल आक्रमक; कारवाई झाली तर सरकार पडेल, भाजपावर हल्लबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातून देणगी आणि दानाच्या रकमेत झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिरातून कोट्यवधी रुपयांची चोरी होऊनही अद्याप एकही एफआयआर दाखल न झाल्याने केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा साधत, सरकार नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. X वर एक व्हिडीओ शेअर करत ते असे म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की, राम मंदिरातून तब्बल २०० कोटी रुपयांची रोकड आणि हिरे-जवाहिरांच्या अनेक पेट्या चोरीला गेल्या आहेत. मात्र याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलीस, सीबीआय किंवा ईडीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात आणि केंद्रात त्यांचेच सरकार असताना कुठेही छापे टाकण्यात आले नाहीत किंवा कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घोटाळ्यात अत्यंत बड्या व्यक्तींची नावे गुंतलेली असून, जर सखोल कारवाई झाली तर सरकारही कोसळू शकते, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.

राम मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे केंद्र असून, लोकांची आस्था महत्त्वाची की सरकार वाचवणे महत्त्वाचे, असा प्रश्न केजरीवाल यांनी जनतेला विचारला आहे. या पापात सामील असलेले लोक कितीही मोठे असले तरी त्यांना थेट तुरुंगात टाकले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.