
महायुती सरकारमधील नेते वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मात्र राज्य सरकारविरोधात थेट आक्रमक भूमिका घेत माहिती अधिकार कायद्यातील बदलांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘जनहितासाठी 90व्या वर्षीही सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात उपोषण करण्यास मी तयार आहे,’ असा इशारा अण्णांनी दिला आहे.
राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये करण्यात आलेल्या नव्या बदलांवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने माहिती अधिकार अर्जाचे शुल्क 10 रुपयांवरून थेट 30 रुपये केले असून, माहिती देण्यासाठी असलेली मुदत 10 दिवसांवरून 30 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच, माहिती द्यायची की नाही आणि किती दिवसांनी द्यायची, याबाबत अपिलीय अधिकाऱयाला अंतिम अधिकार देण्यात आल्याने नागरिकांच्या माहिती मिळवण्याच्या अधिकारावर मर्यादा येण्याची भीती व्यक्त होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
























































