
हॉटेलच्या कॅश काउंटरमधील ६ लाख ८६ हजार रुपयांची रोकड चोरून पळालेल्या चोरट्याला खार पोलिसांनी अटक केली. जाहिदअली कुरेशी उर्फ मुर्गी असे त्याचे नाव आहे. मुर्गी विरोधात वांद्रे, निर्मलनगर, आंबोली आदी पोलीस ठाण्यांत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. मुर्गी हा दिवसा रेकी करून रात्रीच्या वेळेस घरफोडी करतो.
तक्रारदार हे खार येथील एका हॉटेलमध्ये काम करतात. शनिवारी सकाळी त्यांच्या हॉटेलमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तीने हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून आत प्रवेश केला. कॅश काउंटरमधील ६ लाख ८६ हजार रुपये आणि मोबाईल असा ऐवज घेऊन पळ काढला. घडल्याप्रकरणी त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या पथकातील सहायक निरीक्षक भरत सातपुते, उपनिरीक्षक माणिक घोगरे, निकम, जाधव, कांबळे, कदम, खेडकर, चव्हाण, काकडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुर्गीला पवई येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून ६ लाख ३८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. सलीम मोहंमद नबी शेख उर्फ पप्पू असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
सलीम हा चुनाभट्टी परिसरात राहत होता. २००३ साली त्याच्या विरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला; त्यानंतर तो सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्याची दखल न्यायालयाने घेतली आणि त्याच्या विरोधात नोव्हेंबर महिन्यात जाहीरनामा जारी केला होता. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी मोहीम हाती घेतली. तो चुनाभट्टी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शेखला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
वाहन अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव वेगातील वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शहाबुद्दीन खान असे मृताचे नाव आहे, तर त्याचा मित्र हकिक खान हा जखमी झाला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
गुरुवारी रात्री शहाबुद्दीन हा त्याचा मित्र हकिक खान सोबत मुंब्रा येथून वांद्रेच्या दिशेने जात होता. रात्री ते दोघे पूर्व द्रुतगती महामार्गावरील दक्षिण वाहिनीवरून जात होते, तेव्हा त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्या अपघातात शहाबुद्दीन आणि हकिक हे जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी शहाबुद्दीनला मृत घोषित केले, तर हकिकवर उपचार सुरू आहेत.
























































