
वयाच्या ४४ व्या वर्षी २३ वेळची ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यम्स टेनिस कोर्टवर पुनरागमन करत आहे. सेरेना विल्यम्स आगामी विम्बल्डन स्पर्धेत एकेरी आणि महिला दुहेरीचे सामने खेळणार आहे. ऑल इंग्लंड क्लबने रविवारी एका निवेदनाद्वारे याला दुजोरा दिला.
सेरेना विल्यम्सला महिला एकेरीसाठी वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे, असे विम्बल्डनने जाहीर केले आहे. सुमारे चार वर्षांनंतर सेरेना व्यावसायिक टेनिसमध्ये परतत असून, ती केवळ एकेरीच नाही, तर तिची मोठी बहीण व्हीनस विल्यम्ससोबत महिला दुहेरी सामन्यातही खेळताना दिसणार आहे.
दरम्यान, हे वृत्त समोर आल्यानंतर विम्बल्डनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली. हा कोणताही सराव नाही, ही खरी बातमी आहे, असे विम्बल्डनने म्हटले तर तर डब्ल्यूटीए टूरने यापेक्षा ऐतिहासिक पुनरागमन दुसरे कोणते असूच शकत नाही, असे म्हणत सेरेनाचे स्वागत केले.
This is not a drill.@serenawilliams will compete in the 2026 ladies’ singles at #Wimbledon as a wild card. pic.twitter.com/1vHnDEQ4xm
— Wimbledon (@Wimbledon) June 21, 2026
विम्बल्डनने सेरेनासाठी वाईल्ड कार्ड राखून ठेवले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला बर्लिनमधील एका दुहेरी सामन्यानंतर सेरेनाला एकेरीसाठी तयार आहे का? असे विचारण्यात आले होते. तेव्हा ती म्हणाली होती, मला माहित नाही की मी यासाठी तयार आहे की नाही. हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. मात्र, आता तिने खेळण्याचा पक्का निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर सेरेनाने एक्सवर मजेशीर पोस्ट केली आहे.
सात वेळा विम्बल्डनवर कब्जा
सेरेना विल्यम्स हिने आतापर्यंत 2002, 2003, 2009, 2010, 2012, 2015 आणि 2017 असे सात वेळा विम्बल्डनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर 14 वेळा तिने दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम जिंकले. यातील 6 विजेतेपद विम्बल्डनमधील आहेत. तसेच सेरेनाने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एकेरी आणि दुहेरी दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते.
4 वर्षानंतर पुनरागमन
सेरेना विल्यम्स शेवटचा एकेरी सामना 2022 च्या यूएस ओपनमध्ये खेळली होती. शेवटच्या सामन्यात तिला अजला टॉमल्यानोविचकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2023 मध्ये तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. प्रदीर्घ काळ टेनिसपासून दूर राहिलेली सेरेना आता 4 वर्षानंतर पुनरागमन करणार आहे.

























































