विराट कोहलीच्या नेतृत्वाच विश्वचषक जिंकणारा खेळाडू आज बँकेत नोकरी करतोय! IPL मध्येही लागलीये कोट्यवधींची बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात प्रत्येक घरात क्रिकेट खेळणारा एकतरी व्यक्ती आढळून येतो. लाखोंच्या संख्येत तरुण-तरुणी देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करत असतात. मात्र, सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत. देशात असे अनेक खेळाडू आहेत जे देशांतर्गत, आयपीएल किंवा टीम इंडियासाठी काही आंतरराष्ट्रीय सामने खेळून अचानक गायब होतात. गायब झालेले खेळाडू सहसा प्रशिक्षक होण्याचा मार्ग धरतात किंवा कॉमेंट्री करण्याचा निर्णय घेतात. पण देशात असे काही खेळाडू आहेत, जे क्रिकेटपासून पूर्णच लांब जाऊन एक वेगळच आयुष्य जगत असतात. असाच एक हिंदुस्थानी खेळाडू सिद्धार्थ कौलची सध्या जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात 19 वर्षांखाली विश्वचषक विजेत्या संघाचा सुद्धा तो महत्त्वाच भाग राहिला आहे.

सिद्धार्थ कौलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द फार मोठी नसली तरी, मिळालेल्या संधीच सोनं करत त्याने आपली छाप सोडली. अंडर-19 विश्वचषकासोबतच त्याने हिंदुस्थानसाठी 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळले. मात्र, राष्ट्रीय संघात वारंवार संधी न मिळाल्यामुळे अखेर सिद्धार्थने 2024 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर सिद्धार्थ प्रशिक्षक किंवा कॉमेंट्र करण्याचा निर्णय घेईल, अशी सर्वांना अपेशा होती. मात्र, त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केलेला सिद्धार्थ सध्या चंदीगडमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत कार्यरत आहे. निवृत्तीनंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी बँकेतील नोकरीसारखा वेगळा मार्ग निवडणे दुर्मिळ असल्याने, त्याची ही बातमी समोर आल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले. News18 ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हिंदुस्थानच्या संघात कमी संधी मिळाल्या असल्या तरी सिद्धार्थची आयपीएलमधील कारकीर्द आणि कमाई लक्षवेधी राहिली. 2008 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला पहिल्यांदा 20 लाख रुपयांना संघात घेतले होते, पण त्याला संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर 2013 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतल. पुढच्या हंगामात म्हणजेच 2014 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला 45 लाख रुपये देऊन संघात ठेवले. पुढे 2018 च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडे (SRH) गेला, जिथे 2018 च्या लिलावात त्याच्यावर तब्बल 3.80 कोटी रुपयांची मोठी बोली लावण्यात आली. मात्र, त्यानंतर 2018 ते 2021पर्यंत हैदराबादच्या संघात होता.

विराट कोहली यू-टर्न घेणार? कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत केले मोठे विधान

सनरायझर्स हैदराबादमधून बाहेर पडल्यानंतर सिद्धार्थ 2022 आणि 2023 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळला. या संघाने त्याला 75 लाख रुपयांना विकत घेतले होते. 2023 नंतर मात्र त्याला आयपीएलमध्ये पुन्हा संधी मिळाली नाही. सिद्धार्थ कौलच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने विविध संघांकडून एकूण 55 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 58 विकेट्सची नोंद आहे. 29 धावांत 4 विकेट्स ही त्याची या लीगमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आहे.