
जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी
खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिला. शिवसेनेचे पदाधिकारी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
दहा वर्ष काम करूनही कंत्राटी कामगारांना १० ते १२ हजार रूपये असा तुटपुंजा पगार मिळतो. त्यांना हक्काचा पगार मिळावा यासाठी सोमवारी प्रथमेश गावणकर यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर येऊन आंदोलकांची भेट घेतली. पगारवाढीबरोबरच नळपाणी योजनेसंदर्भात अन्य मागण्या आठ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील,उपतालुकाप्रमुख विजय देसाई,विभागप्रमुख किरण तोडणकर,संतोष हळदणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


























































