
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाने सोमवारी एक मोठे वळण घेतले आहे. उलूबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित केले आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोठी घोषणा या गटाने केली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
बंडखोर गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वतःला खरी तृणमूल काँग्रेस म्हणवणाऱ्या या नेत्यांनी नवीन संघटनात्मक समिती स्थापन होताच एक प्रस्ताव मंजूर करून अभिषेक बॅनर्जी यांच्या निलंबनाची घोषणा केली.
बंडखोर गटाने हावडा मध्यचे ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची ममता बॅनर्जी यांच्या जागी पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ऋतब्रत गटाची ही बैठक न्यू टाउन येथील एका हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीला बंडखोर आमदारांसह कोलकाता महानगरपालिकेतील आणि अन्य तीन जिल्ह्यांतील तब्बल ७० नगरसेवकांनी हजेरी लावली.
बंडखोर गटाचा काय आहे दावा?
पक्षात निर्माण झालेल्या संवैधानिक पेचप्रसंगामुळे ही बैठक बोलावण्यात आल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. या बैठकीला संबोधित करताना ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले, “पक्षाच्या संविधानानुसार दर तीन वर्षांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. शेवटची समिती फेब्रुवारी २०२२ मध्ये बनवली गेली होती. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेची पुनर्रचना करण्यात आली नव्हती. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करणे गरजेचे झाले होते.”
























































