
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी पंतप्रधान आणि लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. लेबर पक्षाच्या 400 खासदारांपैकी 100 खासदारांनी स्वतःच्याच सरकारविरोधात आघाडी उघडल्याने संतप्त झालेल्या कीर स्टार्मर यांनी पदाचा राजीनामा दिला. कीर यांनी राजीनामा द्यावा यासाठी आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग, संरक्षण मंत्री जॉन हीली आणि मंत्री जेस फिलिप्स यांनी स्टार्मर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पद सोडले होते.
स्टार्मर हे गेल्या दहा वर्षांत पंतप्रधानपद सोडणारे सातवे, तर मागील सात वर्षांत कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडणारे पाचवे पंतप्रधान ठरले आहेत. याआधी थेरेसा मे, बोरिस जॉनसन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. 10 डाऊनिंग स्ट्रीटबाहेर राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, लेबर पक्षाला असे वाटत नाही की मी पुढील निवडणुकीत नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. लेबर पार्टी जुलैच्या मध्यापर्यंत आपला नवा नेता निवडेल. नवा नेता आणि पंतप्रधान निवडले जाईपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतील, असे स्टार्मर म्हणाले. स्टार्मर यांनी आज सकाळी किंग चार्ल्स तिसरे यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. नव्या नेत्याच्या निवडीसाठी येत्या 9 जुलैपासून उमेदवारी प्रक्रिया सुरू होईल, तर 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या उन्हाळी सुट्टीपूर्वी नवीन नेत्याची निवड पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अँडी बर्नहॅम शर्यतीत पुढे
कीर स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा पुढचा वारसदार कोण, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अँडी बर्नहॅम हे उत्तराधिकारी बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. बर्नहॅम यांनी नुकतीच मेकरफिल्ड पोटनिवडणूक जिंकून संसदेत पुनरागमन केले असून त्यांना लेबर खासदारांच्या मोठय़ा वर्गाचा पाठिंबा आहे. ते ब्रिटनच्या राजकारणात एक अतिशय लोकप्रिय चेहरा मानले जातात. त्यांना पक्षाच्या डाव्या आणि मध्यवर्ती दोन्ही गटांचा पाठिंबा आहे.


























































