FIFA World Cup 2026 – स्पेनचा गोलधमाका; सौदी अरेबियाचा 4-0 असा उडवला धुव्वा, विजयासह गटात अव्वल स्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्पेनने पहिल्या सामन्यातील अपयश पुसून टाकत फिफा वर्ल्डकपच्या दुसऱया लढतीत गोलधमाका उडवून दिला. स्पेनने ‘एच’ गटाधील सामन्यात सौदी अरेबियाला 4-0 ने पराभूत करत बाद फेरीच्या दिशेने कूच केले आहे. या विजयामुळे स्पेनने दोन सामन्यांनंतर चार गुण मिळवले असून गटात पहिले स्थान पटकावले आहे. स्पेनच्या लामिन यमाल आणि मिकेल ओयार्झाबाल यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यमालने एक गोल केला आणि अनेक चांगल्या संधी निर्माण केल्या, तर ओयार्झाबालने दोन गोल केले.

आपल्या सलामीच्या सामन्यात काबो व्हर्डेविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधलेला स्पेनचा संघ सौदी अरेबियाविरुद्ध उत्तम लयीत होता. स्पेनने संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ केला आणि आपल्या मजबूत बचावाच्या जोरावर सौदी अरेबियाला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले. स्पेनचा पहिला गोल 10 व्या मिनिटाला झाला. डॅनी ओल्मोने डावीकडून एक उत्कृष्ट क्रॉस दिला, जो यमालने अप्रतिमरीत्या नेटमध्ये सरकवला. स्पर्धेतील हा त्याचा पहिला गोल होता. या गोलमुळे स्पेनचा आत्मविश्वास वाढला आणि संघाने आपले आक्रमण सुरूच ठेवले.

30व्या मिनिटाला आयमेरिक लापोर्टने स्पेनची आघाडी दुप्पट केली. डॅनी ओल्मोच्या कॉर्नरवर लापोर्टने हेडर मारला. त्यानंतर चेंडू ओयार्झाबालकडे आला आणि त्याने तो अचूकपणे गोलमध्ये रूपांतरित केला. फक्त तीन मिनिटांनंतर स्पेनने आणखी एक शानदार सांघिक गोल केला. मार्क कुकुरेलाने सौदी अरेबियाच्या बचाव फळीवरून आलेला एक लांब पास नियंत्रित केला आणि पुढे सरसावला. त्यानंतर डॅनी ओल्मोने संधी साधून ओयार्झाबालला पास दिला. ज्याने एका अप्रतिम व्हॉलीद्वारे आपला दुसरा आणि सामन्यातील स्पेनचा तिसरा गोल केला.

दुसऱया सत्राच्या सुरुवातीला प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांनी यमाल आणि ओयार्झाबाल यांना विश्रांती देण्यासाठी मैदानाबाहेर नेले. पण त्यानंतरही स्पेनने आपले वर्चस्व कायम ठेवले. दुसऱया सत्रामध्ये स्पेनने आपला चौथा गोल केला. डॅनी ओल्मोचा सौदी गोलरक्षकाने फटकर अडवला, पण चेंडू सौदी खेळाडू हसन अल्तांबकातीला लागून त्याच्याच जाळ्यात गेला आणि स्पेनने सामना 4-0 ने जिंकला.