
एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयात अॅडमिशन मिळवून देतो, माझी मोठी ओळख आहे अशी बतावणी करत विद्यार्थी व त्यांच्या पालकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या जे. जे. मार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरोधात पाच राज्यांत 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
विष्णू गुडेकर (51) यांच्या मुलाचे कळव्याच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे अॅडमिशन करायचे होते. ही बाब कळताच आरोपी आबिद अन्सारी (51) हा गुडेकर यांना भेटला आणि माझी तेथे चांगली ओळख आहे. तुमच्या मुलाचे 100 टक्के अॅडमिशन करून देतो अशी बतावणी करत 42 लाख रुपये उकळले. अखेर मुलाचे अॅडमिशन झाले नाही. आबिदने आपली फसवणूक केली हे समजताच गुडेकर यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक प्रशांत नेरकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून आबिदला अटक केली.
महाबळेश्वरमधून सटकला, आग्रीपाड्यात सापडला
नेरकर व त्यांच्या पथकाने आबिदचा गुजरात, राजस्थान, लोणावळा, महाबळेश्वर येथे जाऊन शोध घेतला. पण तो एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसल्याने सापडला नाही. त्याला पकडण्यासाठी उत्तराखंड पोलीस महाबळेश्वर येथे शोध घेण्यासाठी गेले असता तो आग्रीपाडा येथील एका इमारतीत लपला असल्याची माहिती नेरकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सलग सहा तास वेगवेगळे वेशांतर करून आबिदला अखेर पकडले.



























































