
मालाड पूर्व येथील संजय गांधी उद्यानांतर्गत असलेल्या संजयनगर येथील वाघेश्वरी देवीचे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. या मंदिरास मोठय़ा संख्येने भाविक व पर्यटक नियमित भेट देत असतात. त्यामुळे हा मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी शिवसेनेने वनमंत्र्यांकडे केली आहे.
वाघेश्वरी मंदिरात प्रत्येक वर्षी अगदी पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा येथे भाविक व पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. परंतु या मंदिराकडे जाणारा रस्ता मातीचा रस्ता असून पावसाळ्यात वाहून जात असल्यामुळे, या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक झाले आहे. तसेच अत्यंत प्राचीन व जीर्ण वाघेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर परिसर सुशोभित करावा, अशी मागणी शिवसेना नेते आणि दिंडोशीचे विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात स्थानिकांनी व लोकप्रतिनिधींनी लेखी पत्राद्वारे मागणी करूनही यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, याकडेदेखील आमदार प्रभू यांनी वनमंत्र्यांचे लक्ष वेधले.
भाविकांना सोयीसुविधा द्या!
वाघेश्वरी मंदिरात येणाऱया भाविक व पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मंदिराचे सुशोभिकरण आणि रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करावे, अशी मागणीदेखील सुनील प्रभू यांनी पत्रात केली आहे.



























































