ड्राय डे – ठाण्यात शनिवार-रविवार, कल्याण-डोंबिवलीत बुधवार ते शुक्रवार, भिवंडीत दर बुधवारी; पाऊस नाही, पाणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल निनोचा वाढता प्रभाव.. पावसाची अनिश्चितत्ता.. खपाटीला गेलेली धरणे.. आणि निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. आगामी काळात दुष्काळी परिस्थिती ओढवू नये यासाठी बारवी, शहाड आणि अंबरनाथ येथील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण, शहाड, डोंबिवली निवासी आणि औद्योगिक क्षेत्र तसेच कल्याण ग्रामीणमधील २७ गावांचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. त्याचबरोबर भिवंडी शहरातही दर बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. ठाण्यातदेखील शनिवार व रविवारी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

बारवी, जांभूळ, शहाड जलशुद्धीकरण केंद्र बंद

पाणीटंचाईचे गंभीर संकट लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून २० टक्के पाणी कपात सुरू केली आहे. एमआयडीसीने बारवी येथील जलशुद्धीकरण केंद्र, जांभूळ शहाड येथील केंद्र बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या तिन्ही जलशुद्धीकरण केंद्रांतून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण, शहाड, डोंबिवली निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण ग्रामीणमधील २७ गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

गृहसंकुले, कंपन्यांना कमी दाबाने पाणी

कल्याण-शीळफाटा रस्त्यालगतची नवीन गृहसंकुले आणि कंपन्या तसेच दुकानांना या पाणी कपातीची झळ बसणार आहे. बुधवार ते शुक्रवार या काळात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असला तरी येणाऱ्या काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि पाणी संकट विचारात घेता पुढील काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

भिवंडीत ‘स्टेम’नेही पुरवठा कमी केला

भिवंडी शहरात दर बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती भिवंडी पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पाणीटंचाईचे संकट विचारात घेऊन स्टेम मार्फत दर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.

दिवा, मुंब्रा, कळव्यात शटडाऊन

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा व वागळे प्रभाग समितीच्या काही भागाला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदा पावसाळा लांबल्याने पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून शुक्रवार रात्री १२ ते रविवार रात्री १२ वाजेपर्यंत ४८ तास शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग क्षेत्रामधील सर्व भागांमध्ये तर वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील रूपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरूनगर, कोलशेत येथील पाणीपुरवठाही बंद ठेवला जाणार आहे.