
पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेली घातक शस्त्रास्त्रे नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडून थेट ड्रोनच्या माध्यमातून हिंदुस्थानात पाठवण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या वर्षी झालेल्या या हत्याकांडाच्या दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये केला आहे. या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
Pahalgam Attack, Human Intelligence, काय म्हटले आहे NIA च्या अहवालात?
एनआयएच्या या दाव्यानंतर आता सुरक्षा विश्लेषकांनी या चार्जशीटच्या आधारे अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, वर्ष 2022 ते 2024 या काळात ‘ह्युमन इंटेलिजन्स’ कडून गुप्त माहिती मिळवण्याच्या यंत्रणेत निर्माण झालेल्या कमतरतेमुळे दहशतवादी काश्मीर खोऱ्यात अगदी सहजपणे वावरत राहिले. सुरक्षा यंत्रणांनी मानवी गुप्तहेरांपेक्षा केवळ आधुनिक तांत्रिक गोष्टींवर जास्त भर दिला, ज्यामुळे हा मोठा सुरक्षेतील त्रुटीचा भाग समोर आला आहे. एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये नमूद केले आहे की, हिंदुस्थानच्या सुरक्षा प्रणालीला चकवा देत बारामुलाच्या गोगल डोरा जंगलात ड्रोनद्वारे ही शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती आणि तिथून ती थेट दहशतवाद्यांच्या स्थानिक साथीदारांपर्यंत पोहोचवली गेली. नियंत्रण रेषेवर हिंदुस्थानी जवानांची अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी हिंदुस्थानात दहशत पसरवण्यासाठी आपल्या जुन्या पद्धती बदलल्या असून, आता ते नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याऐवजी ड्रोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याशिवाय, प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी हे दहशतवादी स्थानिक नागरिकांमध्ये येऊन मिसळले होते. मात्र, त्या भागात सुरक्षेचे स्थानिक नेटवर्क मजबूत नसल्यामुळे या संशयास्पद हालचालींची कोणतीही माहिती वेळेवर सुरक्षा जवानांपर्यंत पोहोचू शकली नाही. यापूर्वी 2024 मध्ये याच गोगल डोरा जंगलातून 20 चिनी पिस्तुले, 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक चिनी ड्रोन जप्त करण्यात आले होते. एनआयएने चार्जशीटमध्ये दहशतवाद्यांनी हिंदुस्थानात येण्यासाठी वापरलेला संपूर्ण मार्ग सविस्तरपणे दाखवला आहे, ज्यामध्ये कोणाच्याही नजरेत न येता दहशतवादी डोंगराळ आणि शहरी भागातून पुढे सरकल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, पूर्वी डोंगराळ आणि दुर्गम भागात राहणारे गुज्जर-बकरवाल समुदायाचे लोक हे सुरक्षा यंत्रणांचे ‘डोळे आणि कान’ म्हणून काम करायचे आणि दहशतवाद्यांची माहिती द्यायचे. मात्र, पीर पंजाल प्रदेशात आता जमिनीवरील या गुप्त माहितीचा मोठा अभाव निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम जम्मूसह इतर भागांवर झाला आहे. यामुळेच या भागात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आगामी अमरनाथ यात्रेची सुरक्षा अधिक मजबूत आणि अभेद्य करण्यासाठी पोलीस आणि सीआरपीएफने सोमवारी कुलगाम ते गांदरबल दरम्यान शोधमोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान काही संशयित ओव्हरग्राउंड वर्कर्सची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


























































