‘ऑपरेशन लोटस’ जोमात, अनेक पक्षांत फूट पाडली;, चिदंबरम यांचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भाजपवर टीका करताना ‘ऑपरेशन लोटस’वरून निशाणा साधला आहे. अलीकडच्या काळात अनेक राजकीय पक्षांमध्ये फूट पाडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “ऑपरेशन लोटस पूर्ण जोमात सुरू आहे. अलीकडच्या काळात बिजू जनता दल (बीजेडी), आम आदमी पक्ष (आप), तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांमध्ये फूट पाडण्यात आली आहे.”

यावेळी त्यांनी राज्यघटनेतील दहाव्या अनुसूचीचाही उल्लेख केला. पक्षांतर रोखण्यासाठी आणि पक्षफोडीच्या प्रकरणांमध्ये आमदार अथवा खासदारांना अपात्र ठरविण्याची तरतूद असलेल्या दहाव्या अनुसूचीबाबत बोलताना चिदंबरम म्हणाले, “भारतीय राज्यघटनेतील दहावी अनुसूची केवळ मूक प्रेक्षक बनून राहिली आहे.”

भारतीय राज्यघटनेतील दहावी अनुसूची ही पक्षांतरबंदी कायद्याशी संबंधित असून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली आहे.