
लखनौमध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावले उचलत या प्रकरणी अनेक स्तरांवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा चौघांना अटक करण्यात आली असून, चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्यांमध्ये इमारतीचे मालक राम कृष्ण उपाध्याय, वीरेंद्र प्रसाद शुक्ला, तुषक कृष्ण जैस्वाल आणि सुरेश कुमार साहू यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. तसेच या घटनेशी संबंधित कथित निष्काळजीपणाबद्दल वीज विभाग, अग्निशमन दल आणि लखनऊ विकास प्राधिकरण (LDA) यांसारख्या विविध विभागांतील चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दोन सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त मुख्य सचिव अमृत अभिजात आणि लखनऊ क्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण कुमार करत आहेत. या पथकाला सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पथकाने पुरावे गोळा करण्यासाठी मंगळवारी सकाळी फॉरेन्सिक तज्ञांच्या सहा सदस्यीय घटनास्थळाला भेट दिली. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
























































