मोठ्या चेहऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून अरविंद केजरीवालांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिरातून कोट्यवधी रुपयांच्या देणगी चोरीप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, राम मंदिरातून देणगी चोरीला गेल्याची बातमी जसजशी पसरत आहे, तसतसे रामभक्त आणि सर्व सनातनी अत्यंत दुःखी आहेत. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून, एकूण पाच प्रमुख प्रश्न समोर येत आहेत.

सरकारला थेट प्रश्न विचारताना केजरीवाल म्हणाले, “संपूर्ण राम मंदिराचे नियंत्रण चंपत राय यांच्या हातात आहे आणि या प्रकरणातील सर्वाधिक आरोप त्यांच्यावरच होत आहेत. तरीही त्यांना अद्याप पदावरून का हटवण्यात आले नाही? जर चंपत राय यांनी तोंड उघडले तर अनेक मोठे चेहरे उघडकीस येतील, अशी भीती सरकारला सतावत आहे का?”

राम मंदिरात भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने रोख रक्कम, हिरे-मोती आणि दागिने अर्पण केले जातात. केजरीवाल यांनी दावा केला आहे की, मंदिरातून सुमारे २०० कोटी रुपयांची रोकड आणि अनेक दागिन्यांच्या पेट्या चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे.

हे मंदिर एका ट्रस्टद्वारे चालवले जाते, ज्याची स्थापना पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली होती. “चंपत राय या ट्रस्टचे सरचिटणीस आणि सर्वेसर्वा आहेत. ते कोण आहेत, कुठून आले आहेत? ते कोणी संत किंवा महात्मा नाहीत,” असा टोला केजरीवालांनी लगावला.

एवढी मोठी घटना घडूनही मंदिराचे व्यवस्थापन अद्याप चंपत राय यांच्याच हातात असण्यावर केजरीवालांनी आक्षेप नोंदवला. “त्यांना सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आणि साक्षीदारांना बदलण्यासाठी वेळ दिला जात आहे का? अखेर त्यांना कोण वाचवत आहे, हे आता जनतेला जाणून घ्यायचे आहे,” असेही ते म्हणाले.