
वांद्रे येथील फुटबॉल मैदान पालिकेतील सत्ताधारी भाजप-शिंदे गटाने सुधार समितीत बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून आज अखेर खासगी व्यावसायिकाच्या घशात घातले. या मैदानाच्या जागी आता ‘एक्झिबेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे.
वांद्रे रेक्लेमेशन येथील हा भूखंड सध्या एक उत्तम फुटबॉल मैदान म्हणून वापरात असून मुंबईतील फुटबॉलपटू आणि क्रीडाप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबई फुटबॉलशी संबंधित संस्थेचे अध्यक्ष राहिले असून, या मैदानाच्या संवर्धनासाठी त्यांनी यापूर्वी विशेष प्रयत्न केले होते. हा भूखंड एक्झिबिशन सेंटरला देण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली होती आणि या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. आजही सुधार समितीत या प्रस्तावाला शिवसेनेकडून विशाखा राऊत, सचिन पडवळ काँग्रेसचे अश्रफ आझमी आदींनी यांनी विरोध केला.
पैसा कमवण्यासाठी मैदाने विकू नका
मुंबईत आधीच मोकळ्या जागा आणि खेळाची मैदाने दिवसेंदिवस कमी होत असताना उपलब्ध मैदानही एक्झिबिशन सेंटरला देऊ नका अशी मागणी करत शिवसेनेसह विरोधकांनी जोरदार विरोध केला. या मैदानावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध खेळाडूंनी सराव केला आहे, सामने खेळले आहेत.
केवळ पैसा कमवण्यासाठी तुम्ही मुंबईतील हक्काची मैदाने कमी करत आहात, हे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी आहे, अशी भूमिका यावेळी विरोधकांनी मांडली. विरोधकांच्या विरोधामुळे याआधीदेखील हा प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आला होता. मात्र आजच्या सुधार समितीच्या बैठकीत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.




























































