राम मंदिर देणगी घोटाळ्याप्रकरणी स्थापन केलेली SIT म्हणजे धूळफेक; अरविंद केजरीवाल यांचा सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाचे (आपचे) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी राम मंदिर देणगी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटीला (विशेष तपास पथक) केवळ ‘धूळफेक’ असल्याचे सांगत सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच एसआयटी कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे म्हटले आहे. अयोध्येला जात असताना लखनऊ विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एसआयटीची स्थापना सत्य उघड करण्यासाठी नाही, तर ठरावीक लोकांना वाचवण्यासाठी करण्यात आली आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.

विमानतळावर पत्रकारांशी बोलताना केजरीवाल यांनी भव्य मंदिराला देणगी स्वरूपात मिळालेली मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेल्याच्या कथित प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. भक्तांनी देवाला अर्पण केलेले हिरे आणि मौल्यवान रत्ने चोरीला गेली आहेत. २०० कोटी रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे आणि २०० किलो चांदीही चोरीला गेली आहे. ही खूप खेदाची आणि संतापजनक बाब असल्याचे ते म्हणाले.

मला खूप दुःख झाले आहे. माझ्यासारखे करोडो लोक आहेत ज्यांना याचे खूप दुःख झाले आहे. म्हणूनच मी अयोध्येला जात आहे. उद्या मी राम मंदिराला भेट देईन आणि प्रभू रामाची पूजा करेन, तसेच हनुमानगढीलाही भेट देईन. या प्रकरणात अब्जावधी रुपयांच्या देणग्यांची कथित चोरी झाली आहे, काही रक्कम परतही मिळवण्यात आली आहे, तरीही कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.

एफआयआरशिवाय एसआयटीची स्थापना होऊ शकत नाही. सीआरपीसी (CrPC) नुसार, एफआयआर दाखल झाल्यानंतरच एसआयटीची स्थापना केली जाऊ शकते. मग ही एसआयटी कोणत्या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आली आहे?” असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे एसआयटी कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या एसआयटीला तपास करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. ही एसआयटी केवळ एक फसवणूक आहे, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे. याचा एकमेव उद्देश ठराविक व्यक्तींना वाचवणे आणि संपूर्ण प्रकरण दडपून टाकणे हाच आहे, असा आरोपही त्यांनी केला.