
शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज नीट पेपरफुटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या पेपरफुटीमुळे राज्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याचे सांगत याप्रकरणी राज्य सरकारने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
नीट परीक्षा हा केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय असला तरी या परीक्षेच्या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सभागृहात चर्चा करावी किंवा किमान निवेदन तरी करावे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारने या प्रकरणाची नोंद घ्यावी असा निर्णय दिला.
मेच्या पहिल्या आठवड्यात नीटचा पेपर फुटला. त्याआधाही महाराष्ट्रात अशा प्रकारे परीक्षांचे पेपर फुटले आहेत. नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्रातून तीन-चार लोकांना अटकही करण्यात आली आहे. याच पेपरफुटीमुळे देशात वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यापुढे परीक्षांचे पेपर फुटणार नाहीत त्यासाठी काय उपाययोजना करणार त्याची माहिती सरकारने सभागृहाला द्यावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.




























































