FIFA World Cup 2026 – फिफाचा ’डबल गेम’ फंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश वरवडेकर

फिफा वर्ल्ड कप म्हणजे एक गंमतच असते. वर्ल्ड कपच्या गट फेरीच्या शेवटच्या दिवशी फुटबॉलप्रेमींची अवस्था दोन लग्नांच्या रिसेप्शनचं एकाच वेळी आमंत्रण आल्यासारखी होते. एका मैदानावर मेस्सी जादू करत असतो, तर दुसऱ्यावर एम्बाप्पे बचावफळीची चाळण करत असतो. यात जीव जातो तो रिमोटचा, पण फिफा मात्र डगमगत नाही. कारण दोन सामने एकाच वेळी खेळवण्यामागे फुटबॉलच्या प्रामाणिकपणाचं सर्वात मोठं रहस्य दडलंय. हाच फिफाचा डबल गेम फंडा नेहमी भावतो आणि थराराला पावतो.

समजा एका गटातील पहिला सामना आधी संपला. दुसऱया मैदानावर उतरणाऱया संघाला कळलं की, अरे, बरोबरी झाली तरी आपण पुढे! मग कोण जीव तोडून आक्रमण करणार? चेंडू मागे, पास मागे, वेळ पुढे… आणि प्रेक्षकांच्या नशिबी जांभया! फुटबॉलचा वेग संपून तो सरळ गणिताचा पेपर होईल.

फिफाला हा आजार चाळीस वर्षांपूर्वीच झाला होता. 1982 च्या स्पेन विश्वचषकात पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया यांचा सामना झाला. अल्जेरियाने आपले सामने पूर्ण केले होते. जर्मनीने एक गोल केला आणि दोन्ही संघांना समजलं की हा निकाल कायम राहिला, तर दोघेही बाद फेरीत! मग काय… उरलेला तासभर चेंडूची नुसती देवाणघेवाण. ना हल्ले, ना थरार, ना गोल. जगभरातील प्रेक्षक संतापले. त्या सामन्याला ‘डिसग्रेस ऑफ गिजॉन’ हे नाव मिळालं. अल्जेरिया बाहेर पडला आणि फिफाची अब्रू धुळीला मिळाली. नाक कापलं गेलं होतं.

तेथेच फिफा शहाणा झाला. चूक एकदा झाली की ती पुन्हा होऊ द्यायची नाही. म्हणून 1986 पासून गट फेरीतील शेवटचे दोन्ही सामने एकाच वेळी सुरू करण्याचा नियम कायम झाला. कारण दुसऱया मैदानावर काय घडलं, हेच माहीत नसेल तर प्रत्येक संघाला जिंकण्यासाठीच खेळावं लागतं. तिथे हिशेब नाही, फक्त हिसका असतो!

यंदा तर हा थरार आणखी वाढलाय. 48 संघ, 12 गट, अव्वल दोन संघ थेट बाद फेरीत आणि तिसऱ्या क्रमांकावरील आठ सर्वोत्तम संघांनाही संधी! त्यामुळे एका गोलाने गटाचं चित्र बदलतं. एका मैदानावर गोल झाला की दुसऱ्या मैदानावरील संघ क्षणात पहिल्यावरून तिसऱयावर घसरतो. एका सेव्हने विश्वचषकाचं स्वप्न जिवंत राहतं आणि एका चुकीने विमानाचं तिकीट घराकडे निघतं.

म्हणूनच गट फेरीच्या अखेरच्या दिवशी टीव्हीवर दोन सामने असतात, पण धडधड एकच असते. कोण पुढे जाणार, कोण घरी जाणार, कोण इतिहास घडवणार आणि कोण इतिहासजमा होणार… याचा निर्णय शेवटच्या शिट्टीपर्यंत कुणालाच माहीत नसतो.

काल रात्री आणि आज सकाळी हा थरार सुरू झालेला आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हे तिन्ही यजमान बाद फेरीत पोहोचलेत. त्यात स्वित्झर्लंड, ब्राझील, मोरोक्को, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे, अर्जेंटिना, कोलंबिया, पोर्तुगाल हे 12 संघ बाद फेरीत पोहोचलेत. आता अजून 20 संघांची नावे निश्चित होतील. याचीच उत्सुकता हे चार दिवस वाढवणार आहेत. या स्पर्धेत 90 मिनिटांचा खेळ असतो म्हणतात. पण वर्ल्ड कपच्या अखेरच्या गट फेरीत खरी लढाई दोन मैदानांवर एकाच वेळी खेळली जाते.  म्हणूनच त्या 90 मिनिटांत संपूर्ण जगाचा श्वास रोखला जातो.