अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी दिली वडिलांच्याच हत्येची सुपारी; मुलाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात अनुकंपा तत्त्वावर वडिलांची नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोल इंडियाची उपकंपनी (पीएसयू) असलेल्या ‘भारत कोकिंग कोल लिमिटेड’ (BCCL) चे कर्मचारी असलेल्या वडिलांची हत्या करण्यासाठी त्याने ज्या दोन लोकांना सुपारी दिली होती, त्यांनाही पोलिसांनी पकडले आहे.

धनबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (एसपी) एस. मोहम्मद याकूब यांनी गुरुवारी रात्री पत्रकारांना सांगितले की, मृत तुलेश्वर नोनिया यांचा मुलगा विजय चौहान याच्यासह अमित सिंग आणि अखिलेश मल्लाह या दोन भाडोत्री मारेकऱ्यांना १९ जूनच्या रात्री झालेल्या या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

नोनिया हे बारोरा येथील बीसीसीएल कोळसा खाणीत कामगार होते. बीसीसीएलमधील त्यांच्या सेवेची केवळ दोन वर्षे शिल्लक होती. त्यांचा मुलगा विजय चौहान याला वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर खाणीत कायमस्वरूपी नोकरी मिळवायची होती आणि याचसाठी त्याने वडिलांचा काटा काढण्याचा कट रचला.

‘त्याने बारोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बदौडा कॉलनीचे रहिवासी असलेले आपले दोन साथीदार मल्लाह आणि सिंग यांच्यासोबत मिळून या हत्येचा कट आखला,’ असे याकूब यांनी सांगितले.

पोलिसांनी स्पष्ट केले की, चौहानने वडिलांच्या हत्येसाठी आपल्या साथीदारांना १० लाख रुपयांची ऑफर दिली होती, मात्र हत्येपूर्वी कोणतीही ॲडव्हान्स रक्कम देण्यात आली नव्हती.

तपासात समोर आले आहे की, चौहानने स्वतःवर संशय येऊ नये म्हणून आधीच एक बनाव रचला होता. त्याने आपल्या वडिलांना सांगितले की तो बिहारमधील औरंगाबाद येथे एका नातेवाईकाच्या लग्नाला जात आहे आणि तो शुक्रवारी सकाळीच घरातून निघून गेला.

‘दरम्यान, ठरलेल्या प्लॅननुसार, शुक्रवारी रात्री नोनिया यांची ड्युटी संपल्यानंतर सिंग आणि मल्लाह यांनी त्यांना आपल्या मोटरसायकलवरून लिफ्ट दिली आणि त्यांना एका निर्जन ठिकाणी नेले, जिथे त्यांनी एका मोठ्या दगडाने ठेचून त्यांची निर्घृण हत्या केली’, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पुरावे नष्ट करण्यासाठी आणि त्यांची ओळख लपवण्याच्या हेतूने मारेकऱ्यांनी त्यांचा चेहरा विद्रूप केला. त्यानंतर ही घटना रस्ते अपघातासारखी दिसावी म्हणून त्यांनी मृतदेह ओढत नेऊन मुख्य रस्त्यावर टाकून दिला, असे ते म्हणाले.

‘एएमपी खाणीतील बीसीसीएल यंत्रणेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोनिया हे सिंग आणि मल्लाह यांच्यासोबत एकाच मोटरसायकलवरून जाताना स्पष्टपणे दिसत होते. हा दुवा हाती लागताच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली, ज्यातून अखेर पूर्ण सत्य समोर आले,’ असे अधिकारी म्हणाले.

पोलीस रेकॉर्डनुसार, मल्लाहची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून मधुबन पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या कोळसा आणि डिझेल चोरीच्या प्रकरणांमध्ये तो यापूर्वीही तुरुंगात जाऊन आला आहे.