पाऊलखुणा – कोकणची वेगळी अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

कोकणची वैभवशाली परंपरा, इथला प्राचीन इतिहास याची ओळख करून देणाच्या उद्देशाने रत्नागिरीतील वैभव सरदेसाई यांनी सुरू केलेलेप्राचीन कोकण’ हे संग्रहालय कोकण भटकंतीत आगळे ठरत आहे.

देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोकणात येणाऱ्या पर्यटकाला निसर्गसुंदर कोकण अनुभवताना कोकणातील जीवनशैलीही अनुभवता यावी या उद्देशाने रत्नागिरीतील वैभव सरदेसाई या युवकाला एक आगळी कल्पना सुचली. यातूनच साकारले ‘प्राचीन कोकण’.

गणपतीपुळ्यातील एका डोंगराळ जमिनीवर त्यांनी 2004 साली ‘प्राचीन  कोकण’ हे संग्रहालय उभारले आहे. हे फक्त संग्रहालय नसून कोकणचा जिवंत देखावा आहे. उघड्या आभाळाखाली तीन एकर भूमीवर हे 500 वर्षांपूवीचे कोकण उभारले गेले आहे.

‘प्राचीन कोकण’ची संकल्पना उभारताना वैभव सरदेसाई यांना अशी जमीन हवी होती, जिथे सुपीक जमीन असलेला मळा, त्याच्यावर टेकडी, त्यापुढे सडा आणि शेवटी कडा अशी रचना असलेली जागा मिळाली व कोकणचे दर्शन घडविणारे एक संग्रहालय उभे राहिले. या जमिनीवर पूर्वीपासून अनेक झाडे होती, त्यापैकी एकाही झाडाला धक्का न लावता ‘प्राचीन कोकण’ची उभारणी झाली, शिवाय त्या वृक्षसंपदेत कोकणातील आणखी काही वृक्षांची भर पडली आहे.

‘प्राचीन कोकण’ परिसरात 140 प्रकारची 477 झाडे आहेत. कोकणातील अतिशय दुर्मिळ वनौषधी इथे पाहायला मिळतात. प्रत्येक झाडाचे नामकरण केले आहे. त्यामुळे ‘प्राचीन कोकण’ पाहायला येणाऱ्या पर्यटकांना कोकणातील फक्त ग्रामीण जीवनच पाहायला मिळत नाही, तर कोकणातील निसर्गदेखील पाहता येतो. ‘प्राचीन कोकणा’तील गुहेतून पर्यटक आत प्रवेश करतो आणि स्वर्गाहून सुंदर असे कोकण व जीवनशैली अनुभवत पुढे जातो. गावच्या चव्हाट्यापासून ग्रामदैवत, खोताचे घर, बारा बलुतेदार, कोकणातील पाळीव आणि वन्यप्राणी, कोकणातील शिमगा सण हे सारे पर्यटक पाहतात तेव्हा त्यांना कोकण अधिक जवळून जाणून घेता येते. इथे पावलापावलांवर कोकणची अनुभूती येते.

‘प्राचीन कोकण’मधील कलाकृती विविध कलाकारांकडून तयार करण्यात आल्या आहेत. कोकणातील सर्वाधिक प्रतिसाद लाभणारे हे ‘प्राचीन कोकण’ संग्रहालय आहे. दरवर्षी एक लाखाहून अधिक पर्यटक ‘प्राचीन कोकण’ला भेट देतात.

‘प्राचीन कोकण’ने येणाऱ्या पर्यटकांना गाईड हा सक्तीचा आणि मोफत ठेवला आहे. हे गाईड कोकणातील जीवनशैली उलगडून सांगतात. त्यामुळे पर्यटकांना रंजक आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळते. गाईड मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून माहिती देतात. ‘प्राचीन कोकण’मुळे आज रोजगार निर्मिती झाली आहे. ‘प्राचीन कोकण’मध्ये 40 जण काम करतात. गेल्या 22 वर्षांत ‘प्राचीन कोकण’ने नवनवीन संकल्पनांची भर टाकली आहे. गणपतीपुळे मंदिरापासून काही अंतरावर असलेले हे ‘प्राचीन कोकण’ पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर शंख सापडतात तसे शंख ‘प्राचीन कोकण’च्या संग्रहालयात पाहायला मिळतात.

‘प्राचीन कोकण’च्या समोरच मॅजिक गार्डन सुरू करण्यात आले आहे. मॅजिक गार्डन ही एक वेगळी आमराई असून इथे हॉरर शो, मॅजिक शो आणि विविध खेळ खेळण्याची संधी पर्यटकांना मिळते. कोकणातील आंबा बागायतदारांनी आपल्या आंबा बागेत अशा प्रकारची मॅजिक गार्डन तयार करून पर्यटकांना आमंत्रित करत एक जोडव्यवसाय सुरू करावा असे वैभव सरदेसाई यांना वाटते.

[email protected]