
>> राहुल गोखले, [email protected]
अस्थिरोगजन्य हृदयविकाराकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या संशोधक प्राध्यापक लिझल झ्युल्के. आफ्रिकन तज्ञ ही ओळख पुढे नेणाऱ्या लिझल झ्युल्के यांना विज्ञान क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लॉरिअल-युनेस्को फॉर विमेन इन सायन्स इंटरनॅशनल लॉरिएट 2026’ हा पुरस्कार जाहीर झाला. युनेस्कोद्वारे दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार त्यांच्या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करतो. जाणून घेऊया याबद्दल…
विकसित देशांमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि चाचण्या सहज उपलब्ध असतात, परंतु आफ्रिकेतील आणि जगातील इतर गरीब देशांमधील परिस्थिती दयनीय असते. तेथे राहणाऱ्या गरीब कुटुंबांना आणि बालकांना भीषण वास्तवाचा सामना करावा लागतो. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निदान करणारी साधी उपकरणेही उपलब्ध नसतात. एखाद्या आजाराचे निदान झालेच, तर उपचारासाठी मोठय़ा रुग्णालयांमध्ये जावे लागते. गरिबीमुळे या कुटुंबांना प्रवासाचा आणि औषधांचा खर्च परवडत नाही. अशावेळी बालपणातील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या संशोधक प्राध्यापक लिझल झ्युल्के यांच्या कार्याचे मोल अधिकच वाढते. नुकताच त्यांना विज्ञान क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘लॉरिअल-युनेस्को फॉर विमेन इन सायन्स इंटरनॅशनल लॉरिएट 2026’ हा पुरस्कार जाहीर झाला. 10 एप्रिल 1968 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे जन्मलेल्या लिझल झ्युल्के यांनी केप टाऊन विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. तेथूनच त्यांनी डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. याव्यतिरिक्त त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधूनही पदवी घेतली आहे. या औपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांना प्रेरणा देणाऱ्या घडामोडी त्यांच्या घरापासून जवळच घडत होत्या. झ्युल्के यांचा जन्म आणि बालपण ज्या केप टाऊन शहरात गेले, तेथेच वैद्यकीय इतिहासातील एक अभूतपूर्व चमत्कार घडला होता. 3 डिसेंबर 1967 रोजी ग्रूट शूर रुग्णालयात डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली यशस्वी मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती. डॉ. बर्नार्ड यांच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या कथा ऐकतच लिझल मोठय़ा झाल्या. त्या कहाण्यांनी त्यांच्या मनात वैद्यकीय संशोधनाची ठिणगी पेटवली.
झ्युल्के यांचे सर्वात मोठे योगदान रुमॅटिक हार्ट डिसीज’ म्हणजेच संधिवातजन्य हृदयविकारावरील संशोधनात आहे. वाताचा ताप प्रामुख्याने कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील तसेच उपेक्षित घटकांमधील, विशेषत जेथे गरिबी मोठय़ा प्रमाणावर आहे आणि आरोग्य सेवांची उपलब्धता मर्यादित आहे, अशा ठिकाणच्या लहान आणि किशोरवयीन मुलांना प्रभावित करतो. वाताच्या तापावर वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचे रूपांतर ‘रुमॅटिक हार्ट डिसीज’मध्ये होते, ज्यामध्ये हृदयाच्या झडपांना कायमची इजा पोहोचते. झ्युल्के यांनी आपल्या संशोधनातून हे सिद्ध केले की, हा आजार केवळ एक वैद्यकीय समस्या नसून तो सामाजिक आणि आर्थिक असमानतेशी थेट जोडलेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून झ्युल्के यांचे संशोधन अस्थिरोगजन्य हृदयविकाराकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलत आहे. हा आजार केवळ एक वैद्यकीय समस्या नसून त्याची मुळे गरिबी, असमानता आणि सामाजिक अन्यायात रुजलेली आहेत असे त्यांचे ठाम मत आहे.
‘रेड क्रॉस चिल्ड्रन्स हॉस्पिटल’मध्ये काम करत असताना त्यांनी गरिबी आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आरोग्यापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी ‘चिल्ड्रन्स हार्ट डिसीज रिसर्च युनिट’ची स्थापना केली. तेथे मुलांच्या हृदयविकारांवर सातत्याने संशोधन केले जाते. त्यांचे संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून ते थेट धोरणात्मक बदलांशी जोडलेले आहे. त्यांनी ‘रेमेडी’ (ग्लोबल रुमॅटिक हार्ट डिसीज मॉनिटरिंग अँड एपिडेमियोलॉजी) अभ्यासाद्वारे भारतातील वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे हे उल्लेखनीय. नवी दिल्लीतील ‘एम्स’सारख्या नामांकित संस्थेतील संशोधकांसोबत मिळून ‘रेमेडी रजिस्ट्री’ची स्थापना त्यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या अभ्यासांतर्गत भारत आणि इतर विकसनशील देशांमधील 3,300 हून अधिक संधिवातजन्य हृदयविकाराच्या रुग्णांच्या स्थितीचे निरीक्षण करण्यात आले. रुग्णांना वेळेवर न मिळणारे उपचार आणि पेनिसिलिनसारख्या प्रतिजैविकांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक त्रुटी या संशोधनाने समोर आणल्या.
झ्युल्के यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले असून जागतिक स्तरावर त्यांच्या कामाचे 91,000 हून अधिक वेळा संदर्भ (सायटेशन्स) दिले गेले आहेत. त्यावरूनच त्यांच्या संशोधन कार्याच्या महतीची कल्पना येऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक हृदय संस्था (हार्ट फेडरेशन) यातदेखील त्या सक्रिय आहेत. त्यांनी ‘रेड क्रॉस चिल्ड्रन्स वॉर मेमोरियल हॉस्पिटल’ आणि पहिली ऐतिहासिक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती त्या ‘ग्रूट शूर हॉस्पिटल’मध्ये बालरोग हृदयरोगतज्ञ म्हणून काम केले. 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘लॅन्सेट कमिशन’च्या पहिल्या जागतिक अहवालानुसार जगभरातील महिलांच्या एकूण मृत्यूंपैकी 35 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे होतात आणि विशेषत तरुण महिलांमध्ये याचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाआहे. संपूर्णपणे महिला तज्ञांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेला हा पहिलाच जागतिक अहवाल होता.
झ्युल्के यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आता या ताज्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे. 89 देशांमधील 504 नामांकनांमधून निवडल्या गेलेल्या अवघ्या पाच पुरस्कार विजेत्यांपैकी त्या एक आहेत. त्यांच्या जीवन तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा म्हणजे त्यांचे दिवंगत मार्गदर्शक आणि ख्यातनाम हृदयरोगतज्ञ प्रोफेसर बोंगाणी मायोसी यांच्याकडून त्यांना मिळालेला ‘लिफ्ट अॅज यू राईज’ हा कानमंत्र होय. त्यामुळेच निष्णात डॉक्टर म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी आफ्रिकेतील अनेक तरुण महिला संशोधकांना आणि डॉक्टरांना वैद्यकीय क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरित केले आहे. आज जागतिक स्तरावर दर तीन संशोधकांमध्ये केवळ एक महिला असल्याचे चित्र आहे, हेच लैंगिक असमानतेचे चित्र बदलण्यासाठी आणि महिलांना विज्ञानात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रा. झ्युल्के यांचे कार्य प्रेरक ठरेल यात शंका नाही.



























































