
>> डॉ. मीनाक्षी पाटील, [email protected]
‘नाटक’ आणि ‘साहित्य’ या दोन कलांमधील नातं समजून घेताना नाटक या दृकश्राव्य कालावकाश असलेल्या रंगमंचीय कलेला जीवनाचे प्रातिभासिक दर्शन घडवणारा, प्रयोगाच्या दृष्टीने लिहिलेला साहित्यिक आकृतिबंध असेच म्हणता येईल.
‘नाटक’ या ललितकलेचा विचार करताना मागील काही लेखांमधून आपण भारतीय नाटय़शास्त्र परंपरेची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेतली. त्यातील अनेक संदर्भ विषयविवेचनाच्या ओघात अधूनमधून येतीलच. मागील लेखापासून आपण ‘नाटक’ आणि ‘साहित्य’ या दोन कलांमधील नातं समजून घेत आहोत. मूलत ‘नाटक’ ही एक स्वतंत्र कला असूनही तिचा ‘साहित्य’ या कलेशी अत्यंत जवळचा संबंध असल्याने नाटकाकडे एक ‘साहित्यप्रकार’ म्हणूनही पाहिले जाते. त्यामुळे या दोन कलांमधील फरक समजून घेणे गरजेचे ठरते.
साहित्याचे वेगवेगळे प्रकार व नाटक यामधला मुख्य फरक म्हणजे नाटकात प्रयोगाला महत्त्व असते. इतर साहित्यप्रकारासारखीच नाटय़संहिता हीदेखील जरी वाचली जात असली व त्या वाचनातून वाचकाला काहीएक अनुभव मिळत असला तरी तो अनुभव परिपूर्ण वाटत नाही, तर त्यातून प्रयोगाची अपेक्षा निर्माण होते. याचाच अर्थ नाटय़संहिता, रंगभूमी आणि प्रयोग या साऱ्यांच्या माध्यमातून नाटक आकार घेत असते. येथे आपल्याला नाटक आणि रंगभूमी यांच्यातील भेद समजून घेणेही गरजेचे आहे. नाटय़ ही रंगमंचीय कला असल्याने नाटकाच्या प्रयोगासाठी एक ‘अवकाश’ (space) -रिकामी जागा हवी असते. नटांना हालचाली करण्यासाठी, वावरण्यासाठी, कृती करण्यासाठी जी जागा निश्चित केली जाते तिला ‘रंगमंच’ असे म्हटले जाते. ही जागा कोणत्याही आकाराची असू शकते. प्राचीन काळापासून विधीनाटय़, नृत्यनाटय़, लोकनाटय़ ही खुल्या पटांगणातही खेळली जात. आजही ग्रामीण भागात तमाशाचे, दशावताराचे खेळ कच्च्या किंवा पक्क्या रंगमंचावर केले जातात. थोडक्यात, नाटक किंवा अन्य रंगमंचीय कलांमध्ये समोर घडणाऱ्या प्रयोगाला म्हणजेच एका अर्थाने ‘पाहणे’, ‘ऐकणे’ या गोष्टीला महत्त्व असते. दृक-श्राव्यता हा नाटकाचा अत्यंत महत्त्वाचा विशेष आहे.
खरे तर नाटक ही एक संमिश्र कला असून त्यात इतर अनेक कलांमधील घटक जसे स्वर, ध्वनि -संगीत, नेपथ्य, रंगवेशभूषा, अभिनय आदि यांच्या मिश्रणातून नाटय़प्रयोग साकारतो. थोडक्यात नाटकात विविध घटक असले तरी तेथे ‘प्रयोग’ आणि ‘पाहणे’ या दोन कृतींना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच ‘पदार्थाभिनयो नाटय़म्’ म्हणजे विशिष्ट वाक्याचा अर्थ समजेल अशा प्रकारचा अभिनय केला जातो तेव्हा ते नाटय़च असते असे नाटय़शास्त्रात नमूद केले आहे. भामहानेपण ‘अभिनेयार्थ काव्य’ म्हणत नाटकातील अभिनयाचे, कृतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पाश्चिमात्य परंपरेतही नाटय़ व्यवहाराशी संबंधित ऊपा व या दोन्ही शब्दातून ‘पाहणे’, ‘कृती करणे’ हेच अर्थ अधोरेखित होतात. थोडक्यात नाटक ही रंगमंचीय कला संहिताकाराचे, दिग्दर्शकाचे व नटाचे माध्यम असते. या अर्थाने नाटक ही दृकश्राव्य कालावकाश विशिष्ट अशी प्रयोगकला आहे.
साहित्यासारखीच नाटक ही कला आशयप्रधान असली तरी तिचे प्रत्यक्ष प्रयोगरूपही अत्यंत महत्त्वाचे असते. नाटय़संहितेत ‘शब्द’ हे महत्त्वपूर्ण असले तरी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी विविध घटकांच्या मेळातून ते रंगमंचावर अवतरतात आणि तेव्हा त्या शब्दांना अनोखे असे नाटय़ात्म, अभिनयगर्भ रूप प्राप्त होते. त्या शब्दांतून, संवादांतून एक नाटय़ निर्माण होत असल्याने त्यांना एक आगळे असे रंगमंचीय परिमाण प्राप्त होते. त्यामुळेच त्या शब्द-संवादातून नाटय़ानुभव आकाराला येतो, प्रेक्षकांना अनुभवता येतो.
या साऱ्या अनुभवात ‘प्रेक्षक’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो किंबहुना नट आणि प्रेक्षक यांच्यातच हा खेळ रंगतो. यामुळेच भारतीय नाटय़शास्त्रात नाटकाला ‘क्रीडनियक’ म्हणजेच एक क्रीडा प्रकारच म्हटले आहे तर अॅरिस्टॉटलनेही नाटकाला ‘जीवनाची सर्जक अनुकृती’ म्हटले आहे. थोडक्यात अगदी आदिम काळाचाही विचार केला तर असे दिसते की आदिमानवाच्या क्रीडाप्रवृत्तीची अभिव्यक्ती असलेल्या शिकारप्रसंगीच्या नैसर्गिक हालचाली किंवा नृत्यातूनच पुनाटक विकसित झाले. या अर्थाने पाहिल्यास शिकारनृत्य, यातुविधी यासारख्या सामुहिक कृती-अनुकृतीतूनच लोकनाटय़ाची निर्मिती होत राहिली, जी कालावकाशात नाटय़शास्त्रात परावर्तीत झाली. या साऱ्याचा विचार करूनच ‘नाना भावो संपन्न, नानावस्थान्तरात्मकम्, लोकवृत्तानुकरणम्, नाटय़मे नन्मया कृतम्’ अशी व्याख्या भरताच्या नाटय़शास्त्रात केलेली दिसते.
थोडक्यात जीवनाचं प्रातिभासिक दर्शन घडवणारा, प्रयोगाच्या दृष्टीने लिहिलेला साहित्यिक आकृतिबंध म्हणजे नाटक असे म्हणता येईल. या नाटय़संहितेच्या आकृतिबंधात नटांना उच्चारण्यासाठी संवाद असतात आणि नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार आदिंसाठी रंगसूचना असतात. त्यामुळे प्रत्येक नाटय़संहितेत संवादांची मुख्य संहिता आणि रंगसूचनांची उपसंहिता असते व यातूनच नाटकाच्या कथानकाची वैशिष्टय़पूर्ण रचना केलेली असते. थोडक्यात नाटककार संवादांतून पात्रांचे विचार, त्यांच्या भावभावना जशा व्यक्त करतो त्याचप्रकारे रंगसूचनांच्या माध्यमातून स्थल, काल, अवकाशाची रचना करतो. याच स्थल, काल, अवकाशातून नाटकातील मूर्त- अमूर्त कसे आकारत जाते, ते पाहूया पुलेखात.
(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)



























































