
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज किल्ले रायगडावर शनिवारी पुन्हा शिवकाळ अवतरला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज… अशी घोषणा घुमली. ढोल, ताशे, हलगी कडाडली. तुताऱ्यांचा निनाद झाला. गुलालाची उधळण झाली आणि अवघा आसमंत ‘ शिवमय झाला. निमित्त होते छत्रपती शिवरायांच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तिथीनुसार साजऱ्या झालेल्या ३५३व्या -शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.
या ऐतिहासिक सोहळ्याचा प्रारंभ २६ जून रोजी शिरकाई न देवीच्या पूजनाने झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जगदीश्वर आणि व्याडेश्वर मंदिरात धार्मिक विधी, अभिषेक आणि पूजाअर्चा संपन्न पन्न झाली. दुपारच्या सत्रात होळीच्या माळावर मर्दानी खेळांनी उपस्थितांना थक्क केले. सायंकाळी ‘ही रात्र शाहीराची’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवचरित्राचा जागर करण्यात आला.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड आणि कोकणकडा मित्र मंडळ महाड यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
शनिवारी पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ध्वजपूजन, पालखी प्रस्थान आणि नगारखान्यासमोरील ध्वजारोहणाच्या साक्षीने शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानंतर भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ढोल-ताशा पथके, पारंपरिक शस्त्रधारी मावळे आणि आसमंतात फडकणाऱ्या भगव्या ध्वजामुळे रायगडावर स्वराज्याचा वैभवशाली इतिहासच जणू साकारला होता. यावेळी रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. समारोपानंतर शिवप्रेमींनी गड स्वच्छता अभियान राबवत ‘स्वच्छ रायगड पवित्र रायगड’चा संदेश दिला.
नागपुरात शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला.























































