
हिंदी मालिका विश्वातील ‘क्युट कपल’ म्हणून ओळखले जाणारे गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे घटस्फोट घेणार आहेत. ‘लॉक अप’ (Lock Upp) या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियर दरम्यान आकांक्षा चमोला हिने ती आणि गौरव घटस्फोट घेत असल्याचा जाहीर खुलासा केला आहे. तसेच ते गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत असल्याचेही तिने सांगितले आहे.
शोमधील एका टास्क दरम्यान आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा हा मोठा गौप्यस्फोट केला. तिने सांगितले की, “माझा आणि गौरवचा घटस्फोट होत आहे. आम्ही गेल्या एक वर्षापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहोत, मात्र आम्ही ही गोष्ट मीडिया आणि लोकांपासून लपवून ठेवली होती.”
आकांक्षाने स्पष्ट केले की, त्यांच्यात कोणताही वाद किंवा कटुता नाही. ती म्हणाली “आमच्यात काही वाईट घडलेले नाही. आम्ही अजूनही एकमेकांशी बोलतो. पण पार्टनर म्हणून आमचे विचार आणि भविष्य एकमेकांशी जुळत नाहीयेत. दुर्दैवाने आमच्या दोघांचे भविष्य एकत्र नाही, त्यामुळे आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.”
तिने पुढे सांगितले की, त्यांच्यातील पती-पत्नीचे नाते संपले असले तरी ते एकमेकांचा आदर करतात. त्यांच्या कुटुंबियांना असे वाटत होते की, काही काळ वेगळे राहिल्याने त्यांच्यातील दुरावा कमी होईल, पण अखेर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
2016 मध्ये झाले होते लग्न
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांचे लग्न 24 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरमध्ये झाले होते. जवळपास 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता हे जोडपे कायदेशीररित्या वेगळे होत आहे. काही महिन्यांपूर्वी गौरव ‘बिग बॉस’च्या घरात असताना आकांक्षा त्याला भेटायला आली होती, तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून कोणालाही त्यांच्या नात्यात दुरावा असेल अशी शंका आली नव्हती. त्यामुळे या अचानक आलेल्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.
























































