
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कथित राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्री वारंवार अयोध्येला जात असताना मंदिर परिसरात सुरू असलेल्या कथित गैरव्यवहारांची त्यांना माहिती कशी नव्हती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला वारंवार भेटी देत होते. मग मंदिरात काय सुरू होते, याची त्यांना कल्पना कशी नव्हती? ते अयोध्येला सुरू असलेल्या कथित चोरीवर देखरेख ठेवण्यासाठी जात होते का, असा टोला त्यांनी लगावला.
अयोध्येतील विकासकामांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. जगभरातून भाविक अयोध्येत येतात. त्यामुळे तेथील पायाभूत सुविधा आणि भाविकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असायला हव्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात झालेली विकासकामे अपेक्षेपेक्षा कमी दर्जाची असल्याचा आरोप त्यांनी केला.






















































