काळजाचा तुकडा वाचवण्यासाठी ‘ती’ ढाल बनली; भूकंपात मुलीला कुशीत धरत आईने प्राण सोडले… फुटबॉलपटूच्या पत्नीचा करूण अंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएला एकामागोमाग दोन शक्तिशाली भूकंपाने हादरला आहे. या भूकंपामध्ये आतापर्यंत 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असताना एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. व्हेनेझुएलाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू हेक्टर बेलो याच्या पत्नीने आपल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीला मृत्यूच्या जबड्यातून वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे.

मारिटिमो डी ला ग्वायरा या क्लबसाठी खेळणारा फुटबॉलपटू हेक्टर बेलो याने इंस्टाग्रामवर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत ही दुःखद माहिती दिली. बुधवार 24 जून रोजी झालेल्या लागोपाठच्या दोन भयानक भूकंपांमध्ये त्याची पत्नी अँड्रिया बेलो हिचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूच्या दाढेत असतानाही तिने एक वर्षाची मुलगी अलाना हिच्यासाठी स्वतःची ढाल केली आणि तिला जीवदान दिले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

मम्मी, तू कायम आमची सर्वात लाडकी हिरो राहशील. मी आपल्या बाळाला नेहमी हे आठवण करून देत राहीन की तू किती अप्रतिम होतीस आणि तिचे तुझ्यावर किती प्रेम होते. मी तिला तुझी शौर्यगाथा सांगेन की कशाप्रकारे तू स्वतःचा जीव देऊन आपल्या मुलीचे प्राण वाचवले. तू इतकी धाडसी स्त्री होतीस, जिने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलीची साथ सोडली नाही, असे हेक्टरने आपल्या पत्नीच्या आठवणीत एक फोटो शेअर करत म्हटले.

माझ्या बाळा… मला तू खंबीर हवी आहेस. थोडी वाट बघ, माझे हे तुकडे झालेले हृदय जोडण्यासाठी मला फक्त तुझीच गरज आहे. आता तुला तुझा बाबा नेहमीसारखा खंबीर किंवा हसताना दिसणार नाही, पण मी स्वतःला सावरून तुला जगातील सर्वात सुखी मुलगी बनवण्याचे वचन देतो. आता फक्त तू आणि मीच उरलो आहोत आणि तुझी मम्मी स्वर्गातून आपल्यावर लक्ष ठेवून आहे. मला माहित आहे अँड्रिया मला हे दुःख सहन करण्याची शक्ती देईल. या एवढ्या मोठ्या वेदनेतून जाताना मला एकच गोष्ट माहित आहे की, जर तिला माझ्याशी बोलण्यासाठी एक मिनिट जरी मिळाला असता, तर तिने मला हेच सांगितले असते की- ‘जसे मी माझ्या प्राणाची बाजी लावून आपल्या बाळाचे रक्षण केले, तसेच तूही तिचे रक्षण कर, असेही हेक्टरने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले.

दरम्यान, व्हेनेझुएलाची फुटबॉल प्रेस संघटना कुमान दे कॅम्पिओनेसने दिलेल्या माहितीनुसार, हेक्टर आणि अँड्रिया राहत असलेली इमारत भूकंपात पत्त्यांसारखी कोसळली. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अँड्रियाचा मृतदेह सापडला. पण, तिच्या मातृत्वाच्या शक्तीमुळे तिची 1 वर्षाची मुलगी अलाना या दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहे.