
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रविवार पासून दिल्लीतील जंतरमंतरवर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात लडाखमधील शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आहेत.
वांगचुक यांनी उपोषण सुरू केले तेव्हा जंतरमंतरवर शेकडो आंदोलक, प्रामुख्याने तरुण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी अनेक शेतकरी नेतेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. आंदोलनाची सुरुवात दोन मिनिटांचे मौन पाळून करण्यात आली.
उपोषण सुरू करण्यापूर्वी सोनम वांगचुक आणि CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे समर्थन
CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यापूर्वीच शेतकरी, विद्यार्थी आणि विविध संघटनांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ सह संपूर्ण परीक्षा पद्धतीमधील कथित गैरव्यवहारांबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रविवारी सकाळी दिपके यांनी ‘X’ (ट्विटर) वर माहिती दिली की, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील अनेक शेतकरी नेत्यांना जंतरमंतरवर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.























































