
टी-२० विश्वविजेत्या हिंदुस्थानला आयर्लंडने सलग दुसरा धक्का देत मालिका २-० ने खिशात घातली आणि तब्बल १६ मालिकांपासून तसेच जवळपास तीन वर्षे अबाधित असलेली अजिंक्य मालिका धुळीस मिळवली. क्रिकेटविश्वाला हादरवणाऱ्या या विजयाने आयर्लंडने सिद्ध केले की, नाव मोठे असले म्हणजे विजय हमखास मिळतोच असे नाही.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या १०० व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणाऱ्या हॅरी टेक्टरने जबाबदारीने डाव सावरला. त्याची ५३ धावांची खेळी आणि बेन कॅलिट्झच्या २३ चेंडूंतील ३७ धावांच्या खेळामुळे आयर्लंडने १५४ धावांचे स्पर्धात्मक आव्हान उभे केले.
मात्र १५५ धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. आयर्लंडचा युवा गोलंदाज जय मुंद्रा वादळ बनून आला. त्याने डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच तीन महत्त्वाचे विकेट घेत हिंदुस्थानच्या डावाचे कंबरडे मोडले. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर हिंदुस्थानी फलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. तिलक वर्माने ५५ धावांची खेळी करत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या, पण तो बाद होताच आयर्लंड पुन्हा विजयासमीप पोहोचला.
मग शेवटच्या क्षणी हर्षित राणाने १० चेंडूंत २१ धावा ठोकत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. शेवटच्या षटकांत २० धावांचे लक्ष्य होते. तेव्हा टेक्टरने २ वाइड आणि १ नो टाकत हिंदुस्थानला विजयाची संधी निर्माण करून दिली. मात्र ४ चेंडूंत ११ धावा हव्या होत्या, पण मोक्याच्या क्षणी राणा बाद झाला आणि विजयाच्या आशा मंदावल्या. शेवटच्या चेंडूंवर आठ धावांची गरज होती आणि प्रिन्स यादवने षटकार ठोकून केवळ पराभवाचे अंतर कमी केले.



























































