
अयोध्येतील श्रीराममंदिरात देणगीचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण चर्चेत असताना बद्रीनाथ – केदारनाथ समितीवरही आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि विकेश सिंह नेगी यांनी माहितीच्या अधिकारातून (आरटीआय) मिळालेल्या माहितीच्या आधारे धक्कादायक दावे केले आहेत.
नेगी यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर समितीतील काही सदस्यांनी प्रवास भत्ता (टीए) आणि दैनिक भत्त्याच्या (डीए) नावाखाली एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत लाखो रुपये घेतले. त्यांनी हा निधी भाविकांनी दिलेल्या देणग्यांमधून खर्च झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेगी यांनी यापूर्वीही मंदिर निधीतून व्हीआयपी पाहुण्यांच्या स्वागतासाठी खर्च झाल्याचा आणि समितीच्या उपाध्यक्षांनी आपल्या पत्नीला कर्मचारी दाखवून पैसे घेतल्याचा आरोप केला होता.
हेलिकॉप्टरचा खर्च आणि वैयक्तिक दौरे
नेगी यांनी आरोप केला की, काही सदस्यांनी विविध धार्मिक कार्यक्रम आणि वैयक्तिक दौरे हे अधिकृत कार्यक्रम असल्याचे दाखवून भत्ते घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बसंत पंचमीनिमित्त नरेंद्रनगर येथे झालेल्या बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या तारखेच्या कार्यक्रमालाही काही सदस्यांनी अधिकृत कार्यक्रम म्हणून दाखवून पैसे घेतले. प्रत्यक्षात हा कार्यक्रम टिहरी राजघराण्याच्या परंपरेनुसार आयोजित केला जातो, असा दावा त्यांनी केला. केदारनाथ आणि इतर धामांच्या दौऱयांसाठी हेलिकॉप्टरचा खर्चही मंदिराच्या निधीतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


























































