Ratnagiri News – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर अपूर्ण मार्गिकेवरून जीवघेणी वाहतूक सुरू; निष्काळजीपणामुळे वाहनधारकांचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले नसताना आणि पावसाचा जोर कायम असतानाही, केवळ प्रशासकीय दबाव आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठी ठेकेदाराने या अपूर्ण मार्गिकेवरून वाहतूक सुरू केली आहे. तांत्रिक निकष पूर्ण न करता आणि सुरक्षेचे कोणतेही उपाय न राबवता सुरू करण्यात आलेल्या या वाहतुकीमुळे येथे केव्हाही मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोनवी पुलाच्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि घाईगडबडीत केले जात आहे. ओल्या आणि अपूर्ण बांधकामावरून अवजड वाहनांची अहोरात्र वर्दळ सुरू असल्याने पुलाच्या मजबुतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी “काम सुरू आहे” किंवा “वाहतुकीस मनाई” असा साधा सूचना फलकही लावण्यात आलेला नाही. यापूर्वी याच पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम घाईत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आले होते, ज्याचा परिणाम म्हणून अवघ्या आठ दिवसांत तिथे तीन गंभीर अपघात घडले होते. त्यातून कोणताही धडा न घेता, आता पुन्हा एकदा ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाने त्याच चुकीची पुनरावृत्ती सुरू केली आहे.

पावसाच्या अतिवृष्टीत डांबर आणि सिमेंट वाहून जात असतानाही, कामाचा दर्जा राखण्याऐवजी केवळ वाहतूक सुरू करण्याचा ठेकेदाराचा अट्टाहास प्रवाशांच्या जिवावर उठला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अपघात घडल्यानंतर पंचनामे आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा, काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षित व पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी होती. मात्र, ठेकेदाराच्या आणि प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक जनतेने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.