
पिण्याचे पाणी, कुपोषण, बाल मृत्यू, पाणी योजनेतील भ्रष्टाचार, अपुऱ्या योजना, प्रचंड खड्डे, बेरोजगारी, भारनियमन, प्रलंबित वनहक्क, अपुऱ्या आरोग्य सुविधा, शिक्षणाची दुरवस्था अशा असंख्य समस्यांनी गांजलेल्या आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी पंधरा दिवसांत बैठक घ्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी दिला आहे.
वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी १८ मे रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भव्य मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. या मोर्चात आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चामुळे हादरलेल्या अधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन मागण्यांवर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार २१ मे रोजी बैठकही निश्चित करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. मात्र आता आचारसंहिता संपूनही अधिकारी बैठक घेण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आश्वासनानुसार ही प्रलंबित बैठक तत्काळ आयोजित करण्याबाबत जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ठोस निर्णय घ्या
आचारसंहितेमुळे २१ मे रोजी होणारी बैठक रद्द होत असल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. मात्र आता आचारसंहिता संपून अनेक दिवस उलटले तरीही बैठकीबाबत अधिकारी हालचाल करत नाहीत. आता कोणतीही सबब न सांगता विनाविलंब सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन धडक मोर्चात मांडलेल्या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय घ्या, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी केली.


























































