Ratnagiri News – मुसळधार पावसामुळे कोंडये वगडे फाट्यापुढे मुख्य रस्त्यावर झाड कोसळले; वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या धो-धो पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस-जाकादेवी मुख्य रस्त्यावरून कोंडये गावात जाणाऱ्या मार्गावर, वगडे फाट्याच्या पुढे एक भलेमोठे वृक्ष मुख्य रस्त्यावरच कोसळल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या मार्गावर हे झाड उन्मळून पडल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोंडये वगडे फाट्यापुढील हा रस्ता कोंडये मधलीवाडी, दसमवाडी, बौद्धवाडी, वरचा मळा, खालचा मळा, देसाईवाडी तसेच डावखोल आणि पुढे कळकदे कोंडकडे जाण्यासाठीचा अत्यंत जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून ठराविक वेळेत धावणाऱ्या लालपरी सह खाजगी वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मधोमध कोसळलेल्या या महाकाय वृक्षामुळे येथील संपूर्ण वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

रस्ता बंद झाल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी बस सोयने फाटा येथून वळवण्यात आली होती, तर खाजगी वाहने सुवरेवाडी अंतर्गत ग्रामीण रस्त्यावरून मार्ग काढत मार्गस्थ होत होती. या कोसळलेल्या वृक्षामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा वृक्ष रस्त्यावरून हटवावा आणि वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून केली जात आहे.