
पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील जनता वसाहत रोड भागात पाण्याच्या दोन पाईपच्या जागेत रानगवा अडकला होता. वनविभाग, पुणे महापालिका आणि RESQ टीमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या गव्याची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी दुपारी 11 वाजून 52 मिनिटांनी विश्रांती नगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड , पुणे येथे नवीन कॅनॉल रोड लगत असलेल्या बंदिस्त पाण्याच्या दोन लाईनच्या मध्ये एक गाय पडून अडकल्याची माहिती मिळाली. सिंहगड रोड अग्निशमन केंद्रा कडील अग्निशमन गाडी व जवान घटनास्थळी पोहोचले असता सदर ठिकाणी गाय नसून एक रानगवा अडकल्याचे दिसून आले. त्वरित जवानांनी वनविभागाची व पोलिसांची मदत मागवली असता घटनास्थळी मदतीला वनविभागाची रेस्क्यू टीम व पोलीस पथक पोचले असता सर्वप्रथम वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने रानगव्याच्या पोटाखालून दोन दोऱ्या व पट्टा सोडून तदनंतर रेस्क्यू व्हॅन मधील डॉक्टरांनी सदर रानगव्यास बेशुद्धीचे इंजेक्शन मारून त्याला बेशुद्ध करून दोरी व बेल्ट च्या सहाय्याने व मदतीला आलेल्या एका क्रेनच्या सहाय्याने हळुवारपणे वर उचलून दोन्ही पाईपच्या मधून बाहेर काढून घटनास्थळी आलेल्या रेस्क्यू वाहनामध्ये ठेवण्यात आले.


























































